आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer 'moving Maybe Slower' Says Novak Djokovic Ahead Of Clash

योकोविक करणार दमदार हॅट्ट्रिकसह वर्षाचा शेवट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा नोवाक योकोविक वर्षाचा शेवट दमदार हॅट्ट्रिकसह करण्याच्या इराद्याने यापुढे कोर्टवर पाऊल ठेवणार आहे. यापुढे वर्ल्ड टूर फायनल्स जिंकण्याचे अन् वर्षाअखेर अग्रमानांकन कायम राखण्याचे आव्हान त्याच्यापुढे आहे.

यांपैकी पॅरिस मास्टर्स जिंकून त्याने एक पायरी सर केली. आता वर्ल्ड टूर फायनल्स अन् अग्रमानांकन कायम राखले, तर त्याची हॅट्ट्रिक पूर्ण होणार आहे.

सर्बियाच्या 26 वर्षीय स्टार टेनिसपटूने स्पेनच्या डेव्हिड फेररवर अंतिम फेरीत 7-5, 7-5 ने मात करण्यासाठी दर्जेदार खेळ केला. हे त्याचे सलग तिसरे एटीपी विजेतेपद असून, यंदाच्या मोसमातील एकूण सहावे अजिंक्यपद होय. एवढेच नव्हे, तर हा त्याचा दोन सेटमधील सलग 17 वा विजय होय.

यंदाचा ऑस्ट्रेलियन ओपन अन् एकूण सहा ग्रँडस्लॅम जेतेपदाचा मानकरी पॅरिस मास्टर्समधील उपांत्यफेरीचा प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर, अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोत्रो आणि फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटसह लंडन येथे वर्ल्ड टूर फायनल्समध्ये झुंजणार आहे.

रविवारी योकोविकने कारकिर्दीतील 40 वे एटीपी जेतेपद खिशात घातले. यंदा सर्बियन टेनिसपटू एकूण आठ स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडकला. दरम्यान, त्याला 60 लढती खेळाव्या लागल्या. आता कुठे तो राफेल नदालला मागे टाकून पुन्हा अग्रमानांकन मिळवण्याच्या शर्यतीत सहभागी झाला आहे.

यंदा ऐनवेळी सर्वोत्तम खेळ कसा करावा लागतो, याचे धडे मी आत्मसात केले. ऑस्ट्रेलियन ओपन आणि त्यानंतर दुबईत माझी सुरुवात दर्जेदार झाली. मात्र, उन्हाळ्यात माझ्या खेळाचा आलेख कधी वर तर कधी खाली होत राहिला. आता पुन्हा मी उच्च दर्जाचे टेनिस खेळत आहे. परिणामी, माझा आत्मविश्वासही बळावला आहे, अशी प्रतिक्रिया योकोविकने दिली.

यंदा मिळालेले यश : योकोविकने यंदाच्या टेनिस मोसमात मेलबोर्न, दुबई, मोंटे कार्लो, बीजिंग आणि शांघई ओपन टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदावर ताबा मिळवला; तसेच विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत त्याने मजल मारली होती.