आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rohit Sharma Innings Saves India A Against West Indies A

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहितच्या खेळीने भारतीय अ संघाचा डाव सावरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिजटाऊन - विंडीज अ संघाच्या वेगवान गोलंदाजीसमोर आघाडीची फळी कोसळल्यानंतर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान साहा यांच्या अर्धशतकी खेळीने भारत अ संघाचा डाव सावरला. विंडीजला पहिल्या डावात 252 धावांत रोखल्यानंतर भारताचा डाव 277 धावांत आटोपला. भारत अ संघाला अवघ्या 25 धावांची निसटती आघाडी घेता आली.
दुस-या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी वेस्ट इंडीज अ संघाने दुस-या डावात बिनबाद 3 धावा काढल्या होत्या. रोहित शर्माचे शतक अवघ्या 6 धावांनी हुकले. मात्र त्याने जबाबदारीने खेळ करताना 94 धावा ठोकल्या. कर्णधार चेतेश्वर पुजारा (50) आणि वृद्धिमान साहा (56) यांनी अर्धशतके ठोकून त्याला चांगली साथ दिली. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी मिळून केवळ 9 धावा काढल्या. अभिनव मुकुंद आणि अजिंक्य रहाणे यांना तर भोपळाही फोडता आला नाही. रहाणे धावबाद झाला. मुकुंदला जॉन्सनने तर 9 धावा काढणा-या शिखर धवनला कार्टरने बाद केले. पुजाराचा अडथळाही कार्टरनेच दूर केला. विंडीजला 252 धावांत गुंडाळून भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशाने भारताने मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली.
रोहितने 159 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार आणि 3 षटकार मारले. पुजाराने 97 चेंडूंत 7 चौकारांसह अर्धशतकी खेळी केली. साहाने 92 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारत 56 धावा काढल्या. मनोज तिवारीने 46 चेंडुत 2 षटकार आणि 3 चौकार मारून आक्रमक 40 धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली.
विंडीज अ संघाकडून कार्टरने 17 षटकांत एक निर्धाव टाकताना 63 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट घेतल्या. जॉन्सनने 3 गडी बाद केले.