आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितचे वनडेत दुसरे द्विशतक, सर्वात मोठी खेळी करणारा एकमेवाद्वितीय,173 चेंडूत 264 धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांची बेसुमार धुलाई, १५३ धावांनी मात; मालिकेत ४-० ने आघाडी
कोलकाता - ईडन गार्डन मैदानावर गुरुवारी भारताने धावांचा कीर्तिमान स्थापित केला. रोहित शर्माच्या आक्रित द्विशतकीय तडाख्यात कर्णधार विराट कोहलीचे छोटेखानी अर्धशतकही झाकोळून गेले. पण त्याचे कोणालाच काही नव्हते. धावा खो-याने, ढिगाने, मणा-मणाने येत होत्या. लंकेच्या गोलंदाजांची कत्तल झाली. भारताने ५० षटकांत ५ बाद ४०४ धावांचे महाकठीण आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात श्रीलंकेला सर्वबाद २५१ धावाच काढता आल्या. भारताने १५३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
मालिका आधीच गमावलेल्या श्रीलंकन गोलंदाजांसाठी गुरुवार काळ्या दिवसाच्या रूपाने उगवला. अगदी नाणेफेकीपासून त्यांना दगाफटका झाला. कोहलीने विनाविलंब फलंदाजी घेतली. रहाणे-रोहितने डाव सुरू केला. मात्र अर्धशतकाकडे निघालेला अजिंक्य २८ धावांवरच थांबला. २४ चेंडूत त्याने ६ चौकार खेचले.
बढती मिळालेल्या रायडूला संधी साधता आली नाही. ८ धावांवर इरंगाने त्याचा बेरंग केला. तो क्लीन बोल्ड झाला. तेव्हा भारतीय धावसंख्या होती ५९ आणि षटक होते १३ वे. इथपासून रोहित-विराट जोडी जमली. एका बाजूने रोहितचा तडाखा सुरू असताना कर्णधाराने अर्धशतक साजरे केले. ६४ चेंडूंत ६६ धावा फटकावून विराट धावबाद झाला. त्याने ६ चौकार मारले. ३९ व्या षटकांत २६२ धावांवर कोहली बाद झाला. पण त्याचे अर्धशतक विस्मरणात गेले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनालाही फार काही करायची संधी नव्हतीच. कारण डावाची सारी सूत्रे रोहितकडे होती. त्याची बॅट आगच ओकत होती. रैना ११ धावांवर चालता झाला. उथप्पाने १६ चेंडूंत नाबाद १६ धावा काढून शर्माला साथ दिली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितची तलवार म्यान झाली. तोवर भारताने ४०० धावांची वेस ओलांडली होती.
पुढे वाचा, रोहितच्या विक्रमी कामगिरीचे विश्लेषण...