आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषकात रोहित ठरू शकतो निर्णायक खेळाडू, कर्णधार विराट कोहलीचा विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - रोहित शर्मा त्याच्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये अनेकदा संघात आत - बाहेर राहिला असला तरी आता तो तंदुरुस्त असल्याने येत्या विश्वचषकात तो भारताचा निर्णायक घटक ठरू शकतो, असा विश्वास विराट कोहली याने व्यक्त केला.

इंग्लंडच्या दौ-यात बोटाला दुखापत झाल्याने मुंबईकर रोहितला दौ-यातून माघार घ्यावी लागली होती. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे आणि त्याने संघासाठी योगदान देणे हे संघाला विजयाप्रत नेण्याची खात्री असल्यासारखेच असते. संघासाठी तो एक अमूल्य खेळाडू आहे. तो ज्या जागेवर पूर्वी खेळत होता, बहुतांशत: त्याच जागेवर तो खेळण्याची शक्यता अधिक असल्याचेही विराटनेही नमूद केले. ऑस्ट्रेलिया दौ-यात तो पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो. त्याला शक्य तितकी अधिक षटके खेळता यावीत, अशीच आमचीदेखील इच्छा आहे.

रोहित प्रचंड कणखर
यश मिळो अथवा अपयश, तो कधीही त्याच्या खेळात किंवा खेळाबाबतच्या त्याच्या भूमिकेबाबत बदल करत नाही. त्यामुळेच बोटाच्या दुखापतीनंतर जेव्हा तो परत मैदानात उतरला त्या वेळी अवघ्या १११ चेंडूंमध्ये १४२ धावांची तुफानी खेळी तो करू शकला, असेही कोहलीने म्हटले आहे. त्यातून तो मानसिकदृष्ट्या किती कणखर आहे, त्याचाच प्रत्यय येतो, असेही त्याने नमूद केले. रॉबिन उथप्पा संघात आल्याने एक यष्टिरक्षक फलंदाज भारताला मिळाला असून उमेश यादव तर ऑस्ट्रेलियात भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज ठरेल. उमेश यादवच्या गोलंदाजीचा वेग चांगला आहे. शिवाय त्याचे चेंडू चांगले स्विंग होतात. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती तो फायद्याचा ठरू शकतो, असेही त्याने सांगितले.
त्याच क्षमतेने खेळणार
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली असली तरी येत्या दोन एकदिवसीय सामन्यांत संघ त्याच क्षमतेने खेळणार असल्याचेही कोहली म्हणाला. विश्वचषक जवळ येत असल्याने विजयाची लय कायम राखण्याचाच आमचा प्रयत्न असल्याचेही त्याने नमूद केले.