आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rozer Federar Won On Saiman In French Open Tennis

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररची सायमनवर रोमांचीत मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- दुसर्‍या मानांकित रॉजर फेडररने करिअरमधील 900 वा विजय मिळवून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 15 व्या मानांकित जाइल्स सायमनवर 6-1, 4-6, 2-6, 6-2, 6-3 अशा फरकाने रोमांचक विजय मिळवला. त्याने 179 मिनिटे रंगलेल्या लढतीत बाजी मारली.

फेडररने या विजयासह 36 वेळा ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. तसेच त्याने रोलाँ गॅरोमध्ये आपला विक्रमी 58 वा विजयही साजरा केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना सहाव्या मानांकित ज्यो विल्फ्रेंड त्सोंगासोबत होईल. या लढतीतील विजयाच्या बळावर फेडररला अंतिम चारमध्ये प्रवेश करता येईल.

चौथ्या फेरीच्या लढतीत फेडररला दुसर्‍या सेटमध्ये जाइल्सने धूळ चारली. फ्रान्सच्या 28 वर्षीय खेळाडूने सातव्या गेममध्ये स्विसच्या फेडररची सर्व्हिस ब्रेक करून लढतीत बरोबरी मिळवली. त्यानंतर स्विसच्या खेळाडूने दमदार पुनरागमन करताना चौथ्या सेटच्या सहाव्या आणि आठव्या गेममध्ये ब्रेक पाइंट मिळवून 2-2 ने बरोबरी साधली. त्यानंतर निर्णायक पाचव्या सेटमध्ये सुरेख बॅकहॅँड मारून त्याने सामना आपल्या नावे केला.

स्पेनच्या टॉमी रोब्रेडोचा विक्रम
स्पेनच्या टॉमी रोब्रेडोने तब्बल 86 वर्षांनंतर विक्रमी कामगिरी केली. त्याने सलग तीन ग्रँडस्लॅममध्ये दोन सेट गमावल्यानंतरही उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. यापूर्वी 1927 मध्ये हेन्री कोकहेटने विम्बल्डनमधे ही कामगिरी केली होती. टॉमी रोब्रेडोने स्पेनच्या निकोलस अलमाग्रोचा पराभव केला. त्याने 6-7, 3-6, 6-4, 6-4, 6-4 ने विजय मिळवला. आता त्याचा सामना स्पेनच्या डेव्हिड फेररसोबत होईल.

पेस-यांकोविकची विजयी सलामी
भारताचा खेळाडू लिएंडर पेसने सोमवारी जेलेना यांकोविकसोबत गेलिना वास्कोबोएवा-डॅनियल ब्रासेलीचा 7-5, 6-3 अशा फरकाने पराभव केला.

सारा इराणी उपांत्यपूर्व फेरीत
इटलीच्या सारा इराणीने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोला 5-7, 6-4, 6-3 ने हरवले. गतवर्षी मारिया शारापोवाला नमवणार्‍या साराने पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन केले. साराने आक्रमक सर्व्हिस करून विजय मिळवला. तिच्यासमोर आता चौथ्या मानांकित रांदावस्काचे तगडे आव्हान असेल.