आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी यश: वडिलांनी पाहिले स्वप्न; मुलीने केले पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केरळातील १९८७ ची राष्ट्रीय स्पर्धा. अंतिम फेरीत अव्वल सायकलपटू, सुवर्णपदकाचे लक्ष्य समोर ठेवून महाराष्ट्राचे संजय सातपुते सज्ज. त्यासाठी सुरू झाला संघर्ष. मात्र, सेकंदाने पिछाडीवर पडल्याने सातपुतेंच्या सुवर्णपदकाला हुलकावणी बसली अन् स्वप्नांवर पाणी फेरले गेले. सुवर्णपदक गमावल्याची सल मनाला नेहमीच बोचत राहिली. पुढे त्यांनी युवा खेळाडूंच्या प्रतिभेला चालना देण्याचा वसा घेतला. या सुवर्णपदकाच्या स्वप्नपूर्तीसाठी वडिलांचा सुरू असलेला संघर्ष मुलगी ऋतुजाने हेरला आणि तिने मेहनतीच्या बळावर २८ वर्षांनंतर वडिलांचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची अपूर्व कामगिरी केली.

वडिलांची प्रेरणा
पुण्याची युवा खेळाडू ऋतुजा आठव्या वर्षापासून सायकलिंगकडे वळली. तिला वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तिने १४ व्या वर्षी पहिले सुवर्ण मिळवले. १५ पेक्षा अधिक राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतला. ४ आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व केले. यात तिने २०११ला थायलंडमध्ये आशिया चषकात कांस्यपदक जिंकले.

केरळातच साधला स्वप्नपूर्तीचा योगायोग!
महाराष्ट्रातील नंबर वन ऋतुजाने तब्बल २८ वर्षांनंतर केरळच्या मैदानावरच वडिलांच्या सुवर्णपदकांच्या स्वप्नपूर्तीचा योगायोग जुळवून आणला. याच मैदानावर शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय सातपुते यांनी १९८७ मध्ये सायकलिंग प्रकारात दुसरे स्थान पटकावले होते. आता याच केरळात मुलीने वडिलांना सुवर्णपदकांची अनोखी भेट दिली.

याचि देही याचि डोळा!
संजय सातपुते यांनी मुलीच्या सोनेरी यशाचा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. यासाठी त्यांना तब्बल दोन तपांपर्यंत दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. सुवर्णपदकाचे स्वप्न मुलीने पूर्ण केले. याचा अभिमान वाटतो, असे ते म्हणाले.

तीन दशकांनंतर...
महाराष्ट्राने राष्ट्रीय स्पर्धेत ३५ वर्षांनंतर सायकलिंग प्रकारात सुवर्ण जिंकले. यापूर्वी मुंबईच्या जसमीन आरेस्टाने १९८० मधील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले होते.