आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • S Sreesanth IPL Spot Fixing News In Marathi, Divyamarathi

श्रीसंतने चौकशीत केला होता तीन मॅच फिक्सर्सचा उल्लेख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारताचा माजी गोलंदाज एस. श्रीसंतला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती, तेव्हा त्याने याप्रकरणी आणखी तीन खेळाडूंचे नाव घेतले होते, असा खुलासा या प्रकरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मुद्गल समितीच्या चौकशी अहवालात करण्यात आला. समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवलेल्या अहवालात म्हटले आहे की, श्रीशांतने तीन खेळाडूंची नावे उघड केली होती; परंतु दिल्ली पोलिसांनी त्यापैकी फक्त एकालाच समन्स दिला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. ते तीन नेमके कोण? याचा तपशील मात्र अहवालात दिला नसून त्यांचा उल्लेख ‘भारतीय क्रिकेटर’ असा केला आहे. मॅच फिक्सिंगप्रकरणी दाऊदचे निकटवर्तीय रमेश व्यास आणि चंद्रेश यांच्या फोन कॉलवरून काही स्टार खेळाडूंची बातचीत रेकॉर्ड करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या मते आयपीएलच्या एका सामन्यावर सुमारे 150 कोटींचा सट्टा लावला जातो.

असद रऊफला का जाऊ दिले?
समितीने मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवरही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. समितीच्या मते, पाकिस्तानी पंच असद रऊफसुद्धा या प्रकरणात सामील असल्याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना 12 मे 2013 रोजी होती. तरीसुद्धा त्यांनी रऊफची कोणतीही चौकशी न करता त्याला सहजरीत्या देशाबाहेर जाऊ दिले.

पोलिसांच्या मते दाऊद मास्टरमाइंड नाही
मुंबई पोलिसांच्या चार्जशीटमध्ये फक्त मयप्पन व विंदू दारासिंग यांचीच नावे आहेत; परंतु स्पॉट फिक्सिंग व मॅच फिक्सिंग प्रकरणात अनेक लोक सामील होते. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत डॉन दाऊद इब्राहिमचे नाव पुढे आले; परंतु मुंबई पोलिसांनी तो या प्रकरणात सामील नसल्याचे म्हटले. दाऊदचा निकटवर्तीय रमेश व्यासने दाऊदच हा धंदा चालवत असल्याचे म्हटले होते.

विंदूच्या आयपॅड डाटाची चौकशी नाही ?
मॅच फिक्सिंग प्रकरणातील आरोपी विंदू दारासिंगने त्याच्या आयपॅडवरील सर्व माहिती डिलिट करून टाकली होती. नंतर न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने ती परत मिळवण्यात आली; परंतु परत मिळवलेल्या आयपॅडवरील माहितीची मुंबई पोलिसांनी चौकशीच केली नाही. त्यामुळे आयपॅड डाटा न तपासणे हासुद्धा कटाचाच भाग असल्याचे समितीने म्हटले आहे.

सीओओला माहिती नाही सुपरकिंग्जचा मालक
मुद्गल समितीच्या अहवालात एक आश्चर्यकारक खुलासा करण्यात आला आहे. मयप्पनच्या भूमिकेची चौकशी करत असलेल्या समितीने आयपीएलचे सीओओ सुंदर रमन यांना चेन्नई संघाच्या मालकाबाबत विचारणा केली; परंतु त्यांना याबद्दल मला काहीच माहीत नसून गव्हर्निंग कौन्सिलला याची कधी गरजच पडली नसल्याचे रमण यांनी म्हटले. त्यामुळे चौकशी समितीने आश्चर्य व्यक्त केले आहे.