आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Done Marketing Of Cricket, Foreign Media Praise

सचिनमुळेच क्रिकेटचे खरे मार्केटिंग, विदेशी प्रसारमाध्‍यमांनी केली स्तुती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन / कराची - आयुष्याची 24 वर्षे क्रिकेटला वाहून घेतलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळेच क्रिकेटचे खरे मार्केटिंग झाले, अशा शब्दांत ब्रिटिश आणि पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी सचिनची स्तुती केली आहे. अवघ्या क्रीडाविश्वात अशा प्रकारचा निरोप मिळाला नसल्याचे गौरवोद्गार येथील माध्यमांनी प्रकाशित करून सचिनचा सन्मान केला आहे.
पाक दैनिकाच्या अग्रलेखात सचिन
पाकिस्तानी दैनिकांनी सचिन तेंडुलकरची कणखरता आणि सातत्यतेला अभिवादन करत तो जगातील निर्विवाद महान फलंदाज होता, अशा शब्दांत सचिनच्या निवृत्तीला संपादकीय अग्रेलखांमध्ये जागा दिली आहे. सचिनचा ब्रायन लाराप्रमाणे तोरा नव्हता, स्टीव्ह वॉसारखा कचखाऊ किंवा संगकारासारखा निरुत्साही नव्हता. त्यात असे काही गुण होते, ज्यामुळे तो महान बनला. कणखरता हाच त्यामधला चांगला गुण होता, असे या लेखात म्हटले आहे. 1994-2004 ही सचिनच्या कारकीर्दीच्या बहराची वर्षे होती. दरम्यान, राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीच्या कारकीर्दीपूर्वी भारतीय क्रिकेटच्या आशेची धुरा एकट्या सचिनने आपल्या खांद्यावर पेलली. त्या वेळी भारत क्वचितच सामने जिंकायचा; तरीही सचिन जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज संबोधला जाऊ लागला. खरं तर सचिनमुळेच क्रिकेटची खरी मार्केटिंग झाली, अशा शब्दांत पाकिस्तानी दैनिकांनी सचिनवर कौतुकाचा वर्षाव केला.
टेलिग्राफकडून गौरवोद्गार
क्रिकेटविश्वात सचिन त्याच्या लोकप्रियतेमुळे अजरामर झाला असून त्याची असामान्य कारकीर्द येणा-या पिढीसमोर एक आदर्श ठरली आहे. अशा महान खेळाडूला कोट्यवधी लोकांच्या टाळ्यांनी आणि साश्रुनयनांनी दिलेला निरोप आजपर्यंत कोणत्याही खेळाडूच्या वाट्याला आला नाही, असे गौरवोद्गार ‘द डेली टेलिग्राफ’ वर्तमानपत्रात प्रकाशित लेखात काढण्यात आले आहेत. यात निरोपावेळी सचिनने केलेल्या भावनिक भाषणाचाही संदर्भ देण्यात आला आहे. या भाषणातील ‘22 यार्डांत माझ्या आयुष्याची 24 वर्षे गेली’ या वाक्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असून या वेळी वानखेडे मैदानावर उपस्थित प्रेक्षकांसह जगभर टीव्हीवर हे भाषण ऐकणा-या लोकांचेही डोळे पाणावले होते. चाहत्यांनीही त्याला जोरदार समर्थन दिले, अशा शब्दांत टेलिग्राफने हे वर्णन केले आहे.
मंगळवारी वनडे संघ कोचीला
येत्या 21 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या वनडे मालिकेसाठी भारत-वेस्ट इंडीजचे संघ मंगळवारी शहरात दाखल होतील. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ 20 नोव्हेंबर रोजी सराव करतील, असे केरळ क्रिकेट संघटनेने आज एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले. गुरुवारी डे-नाइट वनडे सामना होईल.
शुक्लांकडून सचिनचे समर्थन
सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ जाहीर झाल्याबद्दल बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी त्याचे समर्थन केले आहे. सचिन भारतरत्नचा दावेदार आहे. ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ शासनाकडून आधीच बरेच पुरस्कार दिले जातात. ध्यानचंद अवॉर्ड त्यांच्या नावानेच दिला जातो, असे शुक्ला यांनी या वेळी नमूद केले. इतर संघटनांकडून ध्यानचंद यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा, अशी मागणी होत असल्याने शुक्ला यांनी ही माहिती दिली.