आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Had Doubt His Own Capacity, Disclosed In Autobiography Playing It My Way

सचिनला स्वत:च्या क्षमतेवरच होती शंका, ‘प्लेइंग इट माय वे’ आत्मचरित्रात खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरातील गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरलाच जर स्वत:च्या क्षमतेवर शंका आली असेल तर आपल्याला ऐकून नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे खरे आहे. सचिनने त्याच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात याविषयीचा मोठा खुलासा केला आहे.

गत १९८९ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या वेळी पाकिस्तानचा संघ वसीम अक्रम आणि वकार युनूस यांच्यासारख्या आक्रमक वेगवान गोलंदाजांनी परिपूर्ण होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या धारदार गोलंदाजीने वचक निर्माण करणा-या या गोलंदाजांविरोधात खेळताना मला माझ्याच क्षमतेविषयी शंका निर्माण झाली होती, असे सचिनने आत्मचरित्रात म्हटले आहे. तो पुढे म्हणतो, तो क्षण माझ्यासाठी अग्निपरीक्षेसमान होता. वसीम अक्रम आणि वकार युनूस समोर असताना मी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या क्रिकेटचे प्रदर्शन करू शकेन की नाही, अशी शंका येत होती. तत्कालीन पाक संघात इम्रान, वसीम अक्रम, वकार युनूस, अकीब जावेद हे वेगवान गोलंदाज होते. मुश्ताक अहमद, अब्दुल कादीरसारखे महान फिरकीपटूसुद्धा होते. त्यामुळे माझे पदार्पण विशेष ठरले, असे मला वाटते.

रक्ताने माखलेले शर्ट अन् मियांदादच्या टीकेने परेशान : सियालकोटमध्ये वकार युनूसच्या गोलंदाजीवर जखमी झाल्याची घटना विस्तृतपणे सांगितली आहे. तो म्हणतो, वकारच्या षटकाचा पहिला चेंडू शॉर्ट होता. तो साधारण खांद्यापर्यंत जाईल असे मला वाटले होते. मात्र, माझा अंदाज चुकला आणि तो हेल्मेटमधून थेट माझ्या नाकावर येऊन आदळला. माझ्या शर्टवर रक्ताचे डाग पडले होते. मी यातून सावरण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात जावेद मियांदादने केलेल्या टीकेने मी चकित झालो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वागत आहे
आत्मचरित्राच्या तिस-या प्रकरणात सचिन म्हणाला, वसीम अक्रमने त्याच्या पहिल्याच षटकातील तिसरा चेंडू बाउन्सर टाकला. त्यापूर्वी मी वसीमची गोलंदाजी पाहिली होती. त्यामुळे मला अंदाज होता की यानंतरचा चेंडू यॉर्कर येईल आणि मानसिकदृष्ट्या मी त्यासाठी तयारही होतो. मात्र, वसीमने त्यानंतरचे सर्व चेंडू बाउन्सर टाकले आणि ते पाहून मी उद्गारलो, ‘सचिन, कसोटी क्रिकेटमध्ये तुझे स्वागत आहे.’

हलक्या बॅटने खेळणे कधीच जमले नाही
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जड बॅटने खेळणा-या या विक्रमादित्याने तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त काळ क्रीडाप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे. जड बॅटने खेळण्याच्या रहस्यावरील पडदा खुद्द सचिननेच आपल्या "प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रात दूर केला आहे. वजनाने हलक्या असलेल्या बॅटने खेळण्याचा ब-याचदा प्रयत्न केला; परंतु ते आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकले नाही. मला जड बॅटची सवय झाली होती आणि ती सवय बदलणे माझ्यासाठी आयुष्यभर अशक्य ठरले, असे सचिनने यात म्हटले आहे.