आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय प्रेक्षकांसमोरच सचिनची निवृत्ती?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - विक्रमांचे अगणित मनोरे रचणारा मास्टर -ब्लास्टर सचिन तेंडुलकर घरच्या मैदानावर भारतीय प्रेक्षकांसमोरच कसोटीतून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सचिनच्या निवृत्तीची योजना तयार केली आहे. भारतीय संघ आगामी कसोटी दौर्‍यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार असला तरी त्याआधी दोन कसोटी आणि पाच वनडे सामन्यांसाठी बीसीसीआयने विंडीजला निमंत्रण पाठवले आहे. सचिनने आतापर्यंत 198 कसोटी सामने खेळले असून 200 सामन्यांचे शिखर गाठण्याकरिता त्याला दोनच सामने खेळायचे आहेत. सचिनचा 200 वा कसोटी सामना भारतीय प्रेक्षकांसमोर संस्मरणीय करण्याचा बीसीसीआयचा इरादा आहे.

कोलकात्यात रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक झाली. त्या वेळी कॅरेबियनांना निमंत्रण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही वेस्ट इंडीजला दोन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांसाठी बोलावले आहे. ते आमचे निमंत्रण स्वीकारतील अशी आशा आहे, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले. दक्षिण आफ्रिका दौर्‍याविषयी अजून काहीच निर्णय झाला नसल्याचे हा अधिकारी म्हणाला.

मुंबई आणि कोलकात्यात हे दोन कसोटी सामने होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय बीसीसीआय घेणार आहे.

..मैदानावरून सचिनला निवृत्ती घेता यावी !
सचिनने मागच्या वर्षी अचानक वनडेतून निवृत्तीची घोषणा केली होती. सचिनला मैदानावरून निवृत्ती घेताना पाहता न आल्याने त्याचे कोट्यवधी चाहते निराश झाले होते. कसोटीत सचिनने मैदानावरून निवृत्ती जाहीर करावी, असे मंडळाला वाटते. यासाठीच ही योजना तयार करण्यात येत आहे. 40 वर्षीय सचिनने आपला अखेरचा कसोटी सामना मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. यानंतर त्याने आयपीएलमध्ये सहभाग घेतला आणि निवृत्तीही घेतली.