आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे, टी-20 नंतर कसोटीमधूनही सचिनची निवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सत्य कटू असते अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. त्याचप्रमाणे सचिनच्या निवृत्तीचे सत्य आज त्याच्या चाहत्यांना पचत नसणार हे नक्की. वयाच्या 11 व्या वर्षी सचिनने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आज वय वर्षे 40 आहे. जगभरातील आणि विशेषत: भारतातील 3 पिढ्यांना सचिनशिवाय क्रिकेटच माहिती नाही. खरे म्हणजे 16 पासून 70 वयापर्यंतचे सर्व भारतीय क्रिकेट म्हणजे सचिन किंवा सचिन म्हणजेच क्रिकेट असे समजतात.


सचिन निवृत्तीची घोषणा का करत नाही? नवीन खेळाडूंना संधी का देत नाही? असे प्रश्न आजवर अनेक जण विचारत होते. पण सचिनने निवृत्तीची घोषणा करताच सगळीकडे सन्नाटा पसरला आहे. गुरुवारी सचिनने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली. नोव्हेंबरमध्ये तो वेस्ट इंडीजच्या विरोधात शेवटची कसोटी खेळेल. ही त्याची 200 वी कसोटी असेल. वनडे आणि टी-20 मधून त्याने आधीच निवृत्तीची घोषणा केली आहे. पण सामना पाहताना आता चर्चा कशावर करणार, हा प्रश्न सचिनच्या निवृत्तीनंतर निर्माण झाला आहे.


आजवर चौकार-षटकार बरसताच सचिनच्या नावाचा जयजयकार व्हायचा. तो आऊट झाला तर, त्याने असे नव्हे असे खेळायला हवे होते, अशा चर्चा सुरू. एवढेच काय, पण दुसरा एखादा फलंदाज चांगली फलंदाजी करू लागला तरी, हा सचिन बनणार, असे म्हटले जायचे. किंवा सचिन बनण्याच्या नादात बाद होशील, अशा टीका- टिपण्ण्याही सुरू असायच्या. मुले गल्लीत खेळताना गमतीत म्हणायची, चालला होता सचिन बनायला. सगळीकडे सचिनच होता, आणि कायम राहील. मैदानावरून जरी निवृत्त होत असला, तरी प्रत्येकाच्या घरात, मनात तसाच राहील.


शेवटची कसोटी कोठे?
14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान विंडीजविरुद्ध होणारी अंतिम कसोटी नेमकी कोठे होणार हे अद्याप ठरलेले नाही. मुंबई क्रिकेट संघटनेने ही कसोटी मुंबईतच व्हावी, अशी मागणी केली आहे. बंगालने कोलकात्यात कसोटी व्हावी, असा आग्रह धरला आहे.


क्रिकेटशिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही!
क्रिकेट खेळणे हेच माझे आयुष्यभराचे स्वप्न होते. मी गेल्या 24 वर्षांपासून हे स्वप्न रोज जगतोय. क्रिकेटशिवाय एक दिवस जगण्याचा विचारही करणे अशक्य आहे. कारण हे मी वयाच्या 11 व्या वर्षापासून करत आलोय. मी मायदेशी भूमीवरच 200 वा सामना खेळणार आहे, याच दिवशी निवृत्तही होईन. मला दिलेल्या पाठिंब्यासाठी कुटुंबीय, बीसीसीआय आणि चाहत्यांचे मन:पूर्वक आभार. - सचिन (10 ऑक्टोबरला बोर्ड सचिवांना लिहिलेले पत्र)
सचिन म्हणजे
०40 वर्षांच्या वयापर्यंत मैदानावर सक्रिय. 16 व्या वर्षापासून श्रीगणेशा.
०वनडेतून निवृत्ती : ढाक्यात 18 मार्च 2012ला भारत-पाक सामन्यानंतर
०टी-20 तून निवृत्ती : 6 ऑक्टोबर 2013 ला. चॅम्पियन्स लीगमध्ये मुंबईविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यानंतर
०वनडेत द्विशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज.
०आंतरराष्‍ट्रीय सामन्यांत शतकांचे शतक ठोकणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू.