आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar A Century Kohinoor Navjyotsingh Siddhu

सचिन शतकातला कोहिनूर - नवज्योतसिंग सिद्धू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनच्या निवृत्तीने एका युगाचा शेवट झाला आहे. आज भारतात इतके स्कँडल्स आहेत, इतका अविश्वास वाढला आहे की कोणा एका व्यक्तीकडे बघून आपण म्हणू शकत नाही की, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा.’ बॉलीवूडमध्येही नाही. बॉलीवूडमध्येही मोठमोठे अभिनेते जन्मले. मात्र, सचिनसारखा जगात आजपर्यंत कोणीही जन्मलेला नाही. कोहिनूर जसा शेकडो वर्षांत एकदा सापडतो, तसा सचिन आहे. असा खेळाडू शेकडो वर्षांत एकदाच जन्म घेतो. गौरवाचा एक क्षण कीर्तिरहित युगांपेक्षा श्रेष्ठ असतो. सचिनचे तर सारे जीवन गौरवपूर्ण आहे. सचिनने आपले क्रिकेटचे सारे जीवन सर्वांत उंचीवर जगले. तेनसिंग नोर्गे, हिलरी..ज्यांनी माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली, त्यापेक्षा उंच काही असू शकत नाही, असे त्या दोघांना वाटले होते. तसेच मलाही सचिनबाबत वाटते. सचिनने जे मिळवले आहे, त्यापेक्षा पुढे कोणीही जाऊ शकणार नाही. न भूतो, न भविष्यति..!! आपण जे हाडामांसाचे पुतळे आहोत, त्यापेक्षा तेंडुलकर श्रेष्ठ, मोठा आहे. शेकडो येतील, शेकडो जातील. एक राजा येतो, जातो. दुसरा येतो, तोही जातो. मात्र, संस्था कधीही मरत नाही. तेंडुलकर एक व्यक्ती नाही, तो एक चालती-बोलती संस्था आहे. अनेक पिढ्या तेंडुलकर अमर राहणार.
मला नेहमी वाटते की, सचिनच्या पोटात एक ‘लांडगा’ आहे. त्याची भूक कधीच शांत होत नाही. तो धावांचा भुकेला आहे. नद्या सागरात एकरूप होतात. मात्र, तरीही सागर अतृप्तच असतो. सचिन तेंडुलकरही तसाच धावांच्या बाबत अतृप्त असतो. साध्या क्लबच्या सामन्यात खेळतानासुद्धा तो आपली विकेट सहज टाकत नाही. टिकून खेळतो. सचिनप्रमाणे मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येऊन शिखराची उंची गाठू शकणारी एखादी व्यक्ती भविष्यात येईल, असे मला वाटत नाही. भविष्यात आणखी कोणी शंभर शतके ठोकू शकेल, असा विचार स्वप्नातसुद्धा येणे शक्य नाही.
सचिनने स्वत:ला तब्बल 24 वर्षे खेळात झोकून दिले. समर्पण, एकाग्रतेमुळे तो असे करू शकला. सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढची 24 वर्षे त्याने सलगपणे अपेक्षेच्या ओझ्याखाली, दबावाखाली खेळून काढली. यशस्वीपणे. शक्तिशाली मनुश्य जर आपल्या शक्तीप्रमाणे प्रदर्शन करीत नसेल तर तो निंदा आणि अपेक्षेचा बळी ठरतो. सर्वांत आनंदी तो असतो, ज्याच्याकडून लोकांच्या काहीच अपेक्षा नसतात. मात्र, सचिन ज्या ज्या वेळी मैदानात उतरला, त्या प्रत्येक वेळी त्याच्या खांद्यावर शंभराचे ओझे होते. चाहते त्याला सामान्य माणूस नव्हे, तर देव समजतात. या अपेक्षेच्या ओझ्याला समर्थपणे पेलणे आणि अपेक्षा पूर्ण करणे...असे सलग 25 वर्षे यशस्वीपणे करणे, ही काही छोटी-मोठी गोष्ट मुळीच नाही. ही ऐतिहासिक बाब आहे. या अपेक्षांच्या ओझ्याने सचिन विकसित होत गेला. जबाबदारीमुळे योग्यता आणि शक्ती विकसित होते. सचिनकडे योग्यता होतीच. मात्र, जी शक्ती त्याला मिळाली, ती नेहमी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न, दुबळ्या बाजूला शक्तिस्थानात बदलण्याचे प्रयत्न, अडथळ्याला यशाची पायरी बनवण्याचा प्रयत्न, पराभवाला विजयात बदलण्याच्या प्रयत्नाने त्याला शक्ती मिळाली. ही शक्ती वाढत गेली.
सचिन एकटाच सेना आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे सचिनकडे बघून प्रत्येक भारतीय व्यक्तीमध्ये गौरवाचा उत्साह संचारतो. त्याला बघून आपला गौरव वाढतो. डॉन ब्रॅडमन आॅस्ट्रेलियासाठी होते, सचिन भारतासाठी आहे. ब्रॅडमन आणि सचिनबाबत बोलायचे झाल्यास, ब्रॅडमन फक्त 50 सामने खेळू शकले. सचिनने 200 सामने खेळले. ब्रॅडमन युद्धाच्या काळात खेळू शकले नव्हते. त्यांचा काळ वेगळा होता. खेळ आणि खेळाचे नियमही बरेच वेगळे होते. त्या वेळी वनडे क्रिकेट नव्हते. अनकव्हर्ड पिचेस होत्या. फ्रंटफूट, बॉडीलाइनचे क्रिकेट त्या वेळी होते. ते क्रिकेटच वेगळे, भिन्न होते. मात्र, सचिनचा एका वेगळ्या युगात जन्म झाला. वेगळ्या दृष्टीने त्याने क्रिकेटकडे बघितले. माझ्या मते, दोघेही आपापल्या जागी ऐतिहासिक आणि महान आहेत. दोघांचे महत्त्व वेगळे आहे. दोघांची एकमेकांशी तुलना करणे मला योग्य वाटत नाही. दोघांत महान कोण, हे सांगणे योग्य ठरणार नाही.
एक किस्सा सांगतो. पंजाबमध्ये माझ्या गावात एक वयस्कर व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने मला एकदा विचारले, तू काय करतोस? मी म्हणालो, मी क्रिकेट खेळत होतो. मी आणखी काही पुढे बोलणार, त्याआधी त्यांनीच पुन्हा म्हटले, अच्छा.. तो सचिनचा खेळ खेळतो का?.. त्या व्यक्तीला क्रिकेटबाबत माहिती नव्हते. मात्र, सचिन जो
खेळ खेळतो, ते क्रिकेट आहे, हे त्याला माहिती होते. खेळाडूचे नाव ज्या वेळी खेळापेक्षा मोठे होते, त्या वेळी त्याला ‘तेंडुलकर’चा दर्जा मिळतो.
कहे नानक स्थिर कुछ नहीं, सपने जो संसार..!
‘जो बन्यां से टैंना है एक दिन.’ युगाच्या अखेरीस सुमेरू पर्वतालादेखील आपले स्थान रिक्त करावे लागते. ‘राम गयो, रावण गयो, सकल गयो परिवार..कहे नानक स्थिर कुछ नहीं, सपने जो संसार.’...! या जगात स्थिर असे काहीच नाही. तरीही गेली इतकी 24, 25 वर्षेला स्वत:ला स्थापित करणे..इतकी वर्षे जगात स्वत:ला नंबर वन कायम ठेवणे..ही खूप मोठी गोष्ट आहे. ही फक्त मोठी नव्हे, तर ऐतिहासिक गोष्ट आहे. बहुधा पुढच्या चारशे, पाचशे वर्षांत त्याच्यासारखा दुसरा कोणी होणार नाही. यामुळे संपूर्ण भारताने मान उंचावून सचिन तेंडुलकरकडे बघून..‘आम्हाला तुझा अभिमान आहे,’ असे म्हटले पाहिजे. मी माझ्या मुलाच्या मुलांना अर्थात नातवंडांना ‘मी सचिनसोबत खेळलो आहे’ हे तसेच सचिनची गोष्ट सांगेन.
सचिनने राजकारणात सक्रिय व्हावे काय?
सचिनने समाजातल्या कोणत्याही क्षेत्रात जाऊन आपल्या प्रेरणेने त्याला विकसित केले पाहिजे. ते क्षेत्र मग राजकारण असो किंवा खेळातील प्रशासन असो की आणखी कोणतेही. सचिन कुठेही गेला तरीही त्याची संगत अशी आहे की, त्याच्या उपस्थितीने त्या क्षेत्राचे महत्त्व वाढेल. पाणी दुधात मिसळवा, दुधाच्या भावात विकते. सचिन जेथे जाईल, त्या क्षेत्राची शोभा वाढेल. तो राज्यसभेत गेला, तर राज्यसभेची शोभा वाढली. ही अशी व्यक्ती आहे, जी जगात वेगळी आहे. सचिन सा-या जगात विलक्षण, सा-या जगात उंच आणि सर्वांत वेगळी व्यक्ती आहे. यामुळे त्याला सन्मान द्यावाच लागेल. सचिन एक ऊर्जा आहे. तो जेथे जाईल, तेथे त्याच्या ऊर्जेमुळे वातावरण बदलून जाईल. सचिन जेथे जाईल, तेथे तो सत्कार्यच करेल, असा तो आहे.
झोपेत सचिन चालतो तेव्हा...!
मी 15 वर्षीय सचिन तेंडुलकरला सर्वप्रथम पाकिस्तानात बघितले होते. त्या वेळी मी सचिनला झोपेत चालताना बघितले होते. मी आणि मनोज प्रभाकर हॉटेलच्या बाल्कनीत उभे होतो. एका खोलीचा दरवाजा उघडला. पंधरा, साडेपंधरा वर्षांचा सचिन तेंडुलकर..‘माझी बॅट..माझी बॅट..’ असे बोलत फिरत होता. मनोजने मला म्हटले की, हा झोपेत आहे, त्याला जागे करू नकोस. गुणगुण करीत तो पुन्हा खोलीत गेला आणि झोपला. रात्री स्वप्नातदेखील तो बॅटच बघायचा. प्रत्येक क्षणी तो क्रिकेटलाच समर्पित होता.
शब्दांकन: राजेश शर्मा