आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar And Ricky Pointing Super Flop In Ipl 6

IPL: सचिन तेंडुलकर, पाँटिंग आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दोन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग आयपीएल-6 मध्ये सुपरफ्लॉप होत आहेत. त्यांच्या सुमार कामगिरीचा परिणाम मुंबई इंडियन्सवर होत असून, संघाला अद्याप शानदार सलामी मिळालेली नाही. दोघे सलामीला आल्यानंतर या जोडीला ड्रीम ओपनिंग असे म्हटले जात होते. मात्र, आता त्यांच्या सुमार प्रदर्शनानंतर त्यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याची वेळ आली आहे. सचिनने पाच सामन्यांत 69 तर रिकी पाँटिंगने इतक्याच सामन्यात 52 धावा काढल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने आयपीएल-6 साठी फेब्रुवारीत झालेल्या बोलीत पाँटिंगला खरेदी केले होते. सचिनच्या सल्ल्यानंतरच पाँटिंगला मुंबईचा कर्णधार नियुक्त करण्यात आले. मात्र, दोन्ही फलंदाज आयपीएलमध्ये सलगपणे संघर्ष करीत आहेत. सचिनने स्पर्धेत आतापर्यंत पाच सामन्यांत अनुक्रमे 23, 0, 01, 44 आणि 01 तर रिकी पाँटिंगने 28, 06, 0, 14 आणि 04 धावा काढल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दोघांनी 52 धावांची सलामी दिली होती. मात्र, ही लढत बंगळुरूने दोन धावांनी जिंकली.

चेन्नईविरुद्ध दोघांनी 3 धावा, दिल्लीविरुद्ध शून्य आणि पुणे वॉरियर्सविरुद्ध 54 धावांची भागीदारी केली होती. मुंबईने या तिन्ही लढती आपल्या मधल्या फळीचे फलंदाज दिनेश कार्तिक, रोहित शर्मा आणि केरोन पोलार्र्ड यांच्या बळावर जिंकले होते.

रॉयल्सविरुद्धही ठरले अपयशी
जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सचिन एक तर पाँटिंग चार धावांवर गारद झाले. दोघांनी फक्त चार धावांची सलामी दिली. मुंबईचा या सामन्यात 87 धावांनी पराभव झाला. आता सचिन आणि पाँटिंगला संघाबाहेर करण्याचे धाडस करण्याची अपेक्षा मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाकडून केली जात आहे.

संगकाराचे आदर्श उदाहरण
हैदराबादचा कर्णधार कुमार संगकारा मुंबईसाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकतो. एखादा खेळाडू फॉर्मात नसेल तर तो स्वेच्छेने स्वत:ला डगआऊटमध्ये बसवू शकतो. संगकाराने वॉरियर्सविरुद्ध सामन्यात स्वत:ला ड्रॉप केले होते. मुंबईने पाच सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत. मात्र, हे दोन खेळाडू यापुढेही अपयशी ठरले तर संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावा लागेल.