मुंबई - विश्वचषकातील पाकिस्तानबरोबरचा महत्त्वपूर्ण सामना ज्या वेळी अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळला जाईल, त्या वेळी त्या सामन्यात वर्षानुवर्षे भारत - पाक सामन्यातील महत्त्वाचा घटक राहिलेल्या सचिन तेंडुलकरची उणीव प्रेक्षकांनादेखील जाणवणार आहे.
भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यामध्ये दोन दशकांहून अधिक काळापासून नेहमीच सचिन तेंडुलकर नावाचा घटक सर्वाधिक महत्त्वाचा आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरत होता. मात्र, सुमारे अडीच दशकांच्या कारकीर्दीनंतर सचिन निवृत्त झाल्याने भारत-पाकच्या चुरशीच्या सामन्यात तो दिसणार नसल्याचे वैषम्य सगळ्यांनाच जाणवणार आहे.
सचिनचे पाकविरुद्ध सामने : सचिनने १९९२ सालच्या विश्वचषकातील पाकविरुद्धच्या सामन्यात नाबाद ५४ धावा करण्यासह आमिर सोहेलचा महत्त्वपूर्ण बळी मिळवत सामनावीराचा किताब पटकावला होता. २००३ सालची पाकविरुद्धची त्याची ९८ धावांची खेळी सामन्याचे चित्रच पालटवणारी ठरली होती, तर १९९६ मध्ये त्याने ३१ धावांची खेळी केली होती.