आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar : Handicapped Soliders Willing Fulfilled

सचिन: अपंग सैनिकांची इच्छापूर्ती...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘‘हम तो बंदूक से दुश्मन को मारते हैं ! आपने बल्ले से ही पूरी दुनिया को लिटा दिया,’’ असे म्हटल्यावर सचिन तेंडुलकर चक्क लाजला. मनोमन खुशही झाला. नेहमीच्या विनम्र शैलीत त्याने प्रश्न केला, ‘मैं आपके लिये क्या कर सकता हूं !’ मी म्हणालो, ‘‘हमे मिलने आओ! दिल से दिल मिलाओ...बस और कुछ नहीं!,’’ नायब सुभेदार (निवृत्त) भोपालसिंग चौधरी उत्साहाने सांगत होते.
दोन-अडीच वर्षांपूर्वीची ही घटना. सुहास करमरकर या पुणेकर मित्राच्या विनंतीनंतर सचिनने पुण्याच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर (पीआरसी)मधल्या जायबंदी सैनिकांसोबत वाढदिवस साजरा केला; पण तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून. सचिन मुंबईतून स्क्रीनवरून बोलत होता आणि त्याच्या प्रेमाखातर पुण्याच्या ‘पीआरसी’त केक कापला जात होता. या वेळी भोपालसिंग यांनी सचिनला प्रत्यक्ष येऊन भेटण्याची विनंती केली. सचिनने शब्द दिला आणि तो पाळलाही.
भोपालसिंगांनी आज वयाची 72 वर्षे पार केलीत. सैन्यात एका अपघातात ते कायमचे जायबंदी झाले. चीनविरुद्ध एक, पाकिस्तानबरोबर दोन अशा एकूण तीन युद्धात शत्रूचा मुकाबला केलेला हा निधडा जवान गेली 36 वर्षे ‘पीआरसी’त ‘व्हीलचेअर’वर जगतोय. ‘‘गर्दन से नीचे ‘डेड’ हूं, लेकिन कलेजा ढाई किलो का है! हौसला अब भी बुलंद है!,’’ असे सांगणारे भोपालसिंग मनाने भक्कम आहेत. ते एकटेच नव्हेत, तर त्यांच्यासारखेच आणखी ७८ जण ‘पीआरसी’मध्ये आहेत. या सर्वांमध्ये तीन गोष्टी सारख्या आहेत. एक म्हणजे हे सगळे जण भारतीय सैन्यात होते. सीमेवर देशाचे रक्षण करताना यांच्यातल्या काही जणांच्या कमरेखालचे, तर काहींच्या मानेखालचे संपूर्ण शरीर निकामी झालेय. या प्रत्येकाचे आयुष्य आता कायमचे ‘व्हीलचेअर’ला जखडून गेलेय. तिसरी समानता म्हणजे या सर्वांनी सचिनची ‘ती’ दीड तासाची भेट हृदयात जपून ठेवलीय.
त्या भेटीची आठवण काढल्यावर या सैनिकांचा आनंद ‘व्हीलचेअर’मधून उसळू लागतो. मेजर महेश बिश्त सांगतात, ‘‘एक दिवस अचानक फोन आला की सचिन येतोय. भोपालसिंग यांना त्याने आश्वासन दिले होते खरे; पण ते तो लक्षात ठेवील असे मात्र वाटले नव्हते. त्यामुळेच तो येतोय म्हटल्यानंतर आम्हाला सुखद धक्का बसला. सचिन स्वत: त्याची फोरव्हीलर चालवत आमच्या सेंटरला आला. कोणताही ‘स्टारडम’ जाणवू न देता तो आमच्यात मिसळला. आमच्यातल्या काही जणांनी त्याच्यासाठी व्हीलचेअरवरून बास्केटबॉलची मॅच खेळली. त्याच्याकडून आम्ही येथे एक झाड लावून घेतले. चांगले वाढलेय ते आता.’’
आशियाई आणि देशी क्रीडा स्पर्धांमध्ये शंभरहून अधिक पदके जिंकलेला ‘स्विमर’ सैनिक ए. डी. परेरा यांची पदके सचिनने कौतुकाने न्याहाळली. त्याच्याबरोबर सैनिकांनी फोटो काढून घेतले. बॅटिंग ग्लोव्हजवर सचिनने स्वाक्षरी करून दिली. आवर्जून विनम्रतेने प्रत्येकाशी बोलून सचिनने सर्वांना जिंकले.
सचिनने येताना सैनिकांसाठी आंब्याच्या पेट्याही आणल्या होत्या. सैनिकांचा त्याग ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर सचिन काही वेळा नि:शब्द झाला. भारावून तो म्हणालाही, ‘‘मैं आपके साथ हूं!’’ नुसते बोलला नाही तर कॉर्पोरेट जगताकडून सचिनने दहा लाखांचा धनादेशही त्याच वेळी संस्थेला मिळवून दिला. सैनिकांना आता प्रतीक्षा आहे, ती आणखी एका आश्वासनपूर्तीची. ‘‘पुढच्या वेळी माझ्या मुलांना घेऊन भेटायला येईन,’’ असे सांगून सचिन गेलाय.
सचिनने उचलला भार
नांदेड जिल्ह्यातला अमोल बोरीवाले हा जवान जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर भूसुरुंगात जखमी झाला. त्याचा कमरेखालचा भाग निकामी झालाय. सचिनची भेट तो कधीच विसरू शकत नाही. तो म्हणाला, ‘‘सचिन सर आले तेव्हा त्यांना मी धनुर्विद्येचा खेळाडू असून अपंगांच्या ऑलिम्पिकमध्ये जायचे असल्याचे म्हणालो. या खेळात मी जगात सतराव्या, तर देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, आर्थिक अडचणीमुळे मी सहभागी होऊ शकत नसल्याचे कळल्यावर त्यांनी माझी व माझ्या प्रशिक्षकांची इटलीला जाऊन येण्याची सोय केली. त्यांच्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय पात्रता फेरीत सहभागी होऊ शकलो. आता मी 2016 च्या पॅराऑलिम्पिकची तयारी करतोय.’’
सैनिकांकडून शिकणारा सचिन
सीमेवर असताना कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या सैनिकांकडून सचिनने काही गोष्टी जाणून घेतल्या. युद्धभूमीवर लढताना तुमच्यात जोश कुठून येतो, असा प्रश्न सचिनने केला. त्यावर ‘‘मां के दूध को कोई ललकार दे तो जोश नहीं आएगा?’’ असा प्रतिप्रश्न सैनिकांनीच त्याला केला होता. शरीराची साथ नसताना एकाग्रतेसाठी काय करता, असे सचिनने विचारले. ‘‘उरलेले आयुष्य आता व्हीलचेअरमध्येच जाणार असल्याचे समजल्यानंतरही आमच्यातला कोणीच तुला दु:खी, चिंताग्रस्त दिसणार नाही. सैनिकाचे मनोबल खंबीर असते. आम्ही नियमित योग, व्यायामही करतो,’’ असे सैनिक म्हणाले.
सचिनच्या भेटीने आम्हाला नवी उमेद, नवी ऊर्जा मिळाली. सचिन ऊर्जावान व्यक्ती असून, त्याने आम्हाला भरभरून आनंद दिला, असे सैनिक म्हणतात.
‘दोनशे’ साठी शुभेच्छा !
‘‘आसमॉं की बुलंदीयों में नाम हो आपका,
चॉंद की धरती पे मुकाम हो आपका,
हम तो रहते है सपनों की दुनिया में,
खुदा करे पुरा जहाँ हो आपका!’’
- निवृत्त सैनिक, रिहॅबिलिटेशन सेंटर, पुणे.