आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Happy To Focus On Cricket After Grand Eden Welcome

‘तेंडुलकर मॅनिया’ने झपाटले कोलकाता; 199 वी कसोटी ईडन गार्डनवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- कोलकातावासीयांसाठी यंदा दिवाळी नसून, ‘सचिनोत्सव’ आहे. येथे मास्टर ब्लास्टर फलंदाज तेंडुलकरच्या नावाचेच फटाके फुटत असून, सर्वत्र त्याच्या कारकिर्दीतील 199 व्या कसोटी सामन्याची चर्चा आहे. येथे तो कशी कामगिरी करणार, याची उत्सुकता फुटबॉलसोबतच क्रिकेटवरही जिवापाड प्रेम करणार्‍या शहरातीलच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.

बुधवारी (दि. 6) पासून ईडन गार्डनवर भारत-वेस्ट इंडिज कसोटी सामन्याला सुरुवात होत असून, विक्रमादित्य सचिनच्या कारकिर्दीतील ही अंतिम कसोटी मालिका असल्यामुळे तिला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मातब्बर फलंदाजांच्या असामान्य कर्तृत्वाला सॅल्यूट म्हणून आठवडाभर चालणार्‍या सचिन तेंडुलकर उत्सवाचे बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) आयोजन केल्याची माहिती कोशाध्यक्ष बिस्वरूप डे यांनी दिली.

सचिनचे आगमन केव्हा होणार, याची अनेकजण वाट बघत होते. काहींनी 199 आकडा लिहिलेल्या बास्केटमध्ये तेवढीच गुलाबाची फुलं तेंडुलकरला भेट देण्यासाठी ठेवली होती. सुमारे हजार लोकांनी अशा भेटी नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर मातब्बर फलंदाजांसाठी आणल्या होत्या. मास्टर ब्लास्टरच्या कारकिर्दीतील अंतिम मालिकेत त्याच्यावर कोलकातावासी भेटींची अक्षरश: उधळण करणार आहेत. सचिनचे होर्डिंग्ज, मोठ्या कटआउट्सने संपूर्ण कोलकाता शहर सजले आहे. त्यावर अनेकांनी आपापले विचारही लिहून ठेवले आहेत. सचिनमध्ये मी स्वत:ला बघतो, असे मत महान आॅस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी व्यक्त केले होते. असेच काहीसे कोट त्याच्या होर्डिंग्जवर लिहून ठेवण्यात आले आहेत. सचिन फलंदाजीचा सराव करण्यासाठी ईडनवर येईल तेव्हा त्याने ते बघावेत, एवढाच क्रिकेटप्रेमींचा उद्देश आहे. लाडका खेळाडू चांगला खेळावा म्हणून अनेकांनी देवाला साकडेही घातले आहेत.
सामन्याच्या तिकिटांवर सचिनचा चेहरा ठळकपणे चितारण्यात आला आहे. अशाप्रकारे आजवर कोणत्याही क्रिकेटपटूचे चित्र ईडनच्या तिकिटांवर छापण्यात आले नव्हते.

सचिनचे चित्र असलेले नाणे
कॅब एका बाजूला सचिन आणि दुसर्‍या बाजूला ईडन गार्डनचे चित्र असलेले नाणे बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या हस्ते जारी करणार आहे. विशेष बाब अशी, की याच नाण्याद्वारे कसोटी सामन्यात नाणेफेक होईल. याशिवाय सोन्याची पानं असलेले चांदीचे वडाचे झाडही महान फलंदाजाला भेट देण्याची कॅबची योजना आहे. ग्राउंड्समनही ईडन गार्डनची प्रतिकृती मास्टर फलंदाजाला भेट देतील.

70 हजार मुखवटे वाटणार
सचिनचे 70 हजार मुखवटे सामना बघण्यास येणार्‍या प्रेक्षकांमध्ये वाटले जाणार आहेत. दुसर्‍या दिवशी प्रत्येक आसनावर एक प्लेकार्ड ठेवले जाईल. ते प्रत्येक प्रेक्षकाने हातात उचलून धरल्यानंतर त्याद्वारे सचिनचा एक विशाल आकाराचा चेहरा साकारेल. चौथ्या दिवशी प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महान भारतीय फलंदाजाचा सत्कार होणार असून अमिताभ आणि शाहरुख उपस्थित राहतील.

भेट मेणाच्या प्रतिकृतीची
कॅबचे अध्यक्ष व राज्याच्या क्रीडामंत्र्यांनी एक संगीत अलबम जारी केला असून, ‘क्रिकेटचा देव’ ‘भारतातील लॉर्ड्स’ अशी ख्याती असलेल्या ईडनवर जेव्हा सरावासाठी येईल, त्या वेळी त्यातील सात बंगाली व चार हिंदी गाणी त्याला ऐकवली जातील. याशिवाय एका बंगाली कलाकाराने तयार केलेली सचिनची मेणाची प्रतिकृती त्याला ड्रेसिंग रूममध्ये भेटी दिली जाणार आहे.

छायाचित्रांचे प्रदर्शन
सचिनच्या 100 निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन भवानीपूर क्लब येथे भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी कसोटीपटू सुनील गावसकर व सौरव गांगुली यांच्या हस्ते व्हावे, अशी कॅबची इच्छा होती. दोघेही मदतनिधी कार्यक्रमासाठी श्रीलंकेत असल्यामुळे सामन्याच्या पूर्वसंध्येलाच या प्रदर्शनाचे उद्घाटन शक्य आहे.