आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Scores Hundred In Irani Trophy After 24 Years

‘मास्टर-ब्लास्टर’ने केली ‘लिटल मास्टर’ची बरोबरी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सचिन तेंडुलकरच्या 140 धावांच्या नाबाद शतकी डावाभोवती गुंफला गेलेला मुंबईचा डाव 409 धावांत आटोपला. इराणी करंडक सामन्यात त्यामुळे शेष भारत संघाने पहिल्या डावात निर्णायक ठरणारी 117 धावांची आघाडी घेत तिसर्‍या दिवसअखेर दुसर्‍या डावात 1 बाद 27 अशी मजल मारली होती. वानखेडेवर सचिनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या 25 हजार धावादेखील पूर्ण केल्या. तसेच सुनील गावसकरच्या प्रथर्मशेणी क्रिकेटमधील 81 शतकाच्या विक्रमाशी बरोबरीदेखील साधली.

बर्‍याच कालावधीनंतर ऑफ साइडला अप्रतिम ड्राइव्हज मारणारा सचिन अवतरला होता. अजिंक्य रहाणे (83) पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरल्यानंतर फलंदाजीची तिसर्‍या गिअरमधील गाडी सचिनने पहिल्या गिअरमध्ये टाकली.

भारतीय संघातील प्रवेशासाठी धडपडत असलेला रोहित शर्मा बेदरकार आणि बेजबाबदार फटका मारून बाद झाला. कर्णधार अभिषेक नायरचे अष्टपैलुत्व फलंदाजीत या वेळी दिसले नाही. त्यामुळे 3 बाद 234 अशा स्थितीत शेष भारतावर पहिल्या डावात आघाडी केल्याचे स्वप्न पाहणार्‍या मुंबई संघाचा पहिला डाव 409 धावांत गडगडला. सचिन तेंडुलकर 343 मिनिटे पाठदुखीचा त्रास सहन करूनही किल्ला लढवत होता. 197 चेंडूंत 18 चौकार व 2 षटकारांसह त्याने सुनील गावसकर यांच्या प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील 81 व्या शतकाची बरोबरी केली.

भारताचा हा लिटल मास्टर एका टोकाकडून संयमाने व जबाबदारीने खेळत असतानाच मुंबईच्या मधल्या व तळाच्या फलंदाजांनी बेजबाबदार फलंदाजी करून मुंबईच्या विजयाची शक्यता नष्ट केली.

रोहित शर्मा व अभिषेक नायर हे दोन मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत भागीदारी रचण्यात अपयशी ठरले. अंकित चव्हाणने सचिनसोबत शतकी भागीदारीत 49 धावांचे मोलाचे योगदान दिले. मात्र, अंकित बाद झाल्यानंतर धवल व जावेद खान यांनी सचिनसारखा फलंदाज समोर उभा असतानाही आपल्या विकेट फेकल्या. त्यामुळे सचिन तेंडुलकरचे शेष भारताविरुद्ध आघाडी घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.

24 वर्षांनंतर इराणी करंडकात शतक
तब्बल 24 वर्षांनंतर इराणी करंडकात सचिनने शानदार शतक ठोकले. त्याने शुक्रवारी शेष भारतविरुद्ध सामन्यात मुंबईकडून खेळताना नाबाद 140 धावा काढल्या. त्याने 197 चेंडूंत हे शतक ठोकले. यापूर्वी त्याने वयाच्या 16 व्या वर्षी पहिल्या इराणी करंडकात पहिले शतक ठोकले होते.

आता मी माझ्यासाठी खेळतो : श्रीसंत
भारतीय क्रिकेटमधील ‘अँग्री मॅन’ गोलंदाज अशी प्रतिमा असलेल्या श्रीशांतने आज सांगितले की, ‘मी आता देशासाठी खेळत नाही, तर माझ्यासाठी खेळत आहे. त्यामुळे आता मी क्रिकेट हा खेळ खर्‍या अर्थाने ‘एन्जॉय’ करत आहे,’ असे तो म्हणाला. आज सचिन तेंडुलकरवर आखूड टप्प्याच्या चेंडूचा वर्षाव करण्याची माझी योजना होती. प्रदीर्घ अनुभव असलेला सचिन हा महान फलंदाज आहे. त्याने माझे डावपेच निष्फळ ठरवताना फंट्रफूटवर येत फलंदाजी केली. हरभजन-ओझाने मला योग्य सल्ला दिला, असेही तो म्हणाला.

शतकाचे महत्त्व अधिक - अजिंक्य रहाणे
मुंबईचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने सांगितले की, 83 धावांच्या खेळीपेक्षा शतकी डाव नेहमीच लक्षात राहतो व अधिक समाधान देतो. शतकाचे मोल निश्चितच अधिक आहे. त्यामुळे शतक हुकल्याची चुटपूट लागली. मात्र, सतत खेळत राहणे हे माझे ध्येय आहे. ते मी करत राहणार.