आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar, Sourav Ganguly Foray Into Football, Win ISL Bids News In Divya Marathi

सचिन, सौरव आता फुटबॉल मैदानात; ‘इंडियन सुपर लीग’मध्ये घेतली फ्रँचायझी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या धर्तीवर आता फुटबॉलमध्येही ‘इंडियन सुपर लीग’चे आयोजन करण्यात येणार आहे. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांनी फुटबॉलच्या मैदानावर उडी घेतली असून सचिन कोचीचा तर सौरव कोलकाता संघाचा मालक असेल. आठ फ्रँचायझी संघांची ही स्पर्धा येत्या सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये खेळवली जाईल. अभिनेता रणबीर कपूर, सलमान खान, जॉन अब्राहम यांनीही फुटबॉल संघ खरेदी केले आहेत. या स्पर्धेचे आयोजन आयएमजी रिलायन्सने स्टार इंडियासोबत मिळून केले आहे. स्पर्धेला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा पाठिंबा आहे.

आयोजकांनी रविवारी इंडियन सुपर लीगची (आयएसएल) आणि त्यांच्या संघ मालकांची घोषणा केली. सचिनने पीवीपी वेंचर्ससोबत मिळून कोच्ची फ्रँचायझी खरेदी केली. कोच्चीचे फुटबॉलप्रेमी आणि खेळाडूंनी सचिनला कोच्चीचा संघ खरेदी करण्याची सुरुवातीला विनंती केली होती. सचिनने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. सौरव गांगुली कोलकाता फ्रँचायझीचा मालक असेल. त्याने स्पॅनिश लीगचे दिग्गज अ‍ॅथलेटिको माद्रिद आणि व्यावसायिक हर्षवर्धन नियोतिया, संजीव गोयंका, उत्सव पारेख यांच्यासोबत फ्रँचायझी खरेदी केली. सचिनने फ्रँचायझी संघ विकत घेतला असला तरीही तोच स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असेल, असे आज आयोजकांनी जाहीर केले.

चित्रपट तारेही मैदानात
या फुटबॉल लीगमध्ये बॉलीवूडच्या तार्‍यांनीसुद्धा रुची दाखवली आहे. मुंबई फ्रँचायझी रणबीर कपूर आणि बिमल पारेख यांनी खरेदी केली. सलमान खानने वाधवान ग्रुपसोबत पुण्याची टीम खरेदी केली. जॉन अब्राहमने आयलीग टीम शिलाँग लाजोंगसोबत गुवाहटीची टीम आपल्याकडे घेतली. समीर मनचंदाच्या नेतृत्वाखाली डेन नेटवर्कने दिल्ली आणि आयपीएल टीम हैदराबाद सनरायझर्सचेचे मालक सन ग्रुपने बंगळुरूची टीम खरेदी केली. व्हिडिओकॉनच्या वेणुगोपाल धूत यांनी दत्तराज साळगावकर आणि श्रीनिवास व्ही.डेम्पो यांच्यासोबत गोवा फ्रँचायझी खरेदी केली.

क्रिकेटप्रमाणेच लीग : टी-20 क्रिकेट लीगचे (आयपीएल) यश बघूनच बहुतेक लोकप्रिय खेळांनी लीगचे आयोजन केले. आयपीएलच्या धर्तीवरच आयएसएलचे आयोजन करण्यात आले आहे. एचआयएल (हॉकी), आयबीएल (बॅडमिंटन) या लीगसुद्धा झाल्या आहेत.

फुटबॉलला प्रोत्साहन देणार
मनाने मी नेहमीच खेळाडू राहणार आहे. आयएसएलच्या माध्यमातून देशात सकारात्मक वातावरण तयार करतानाच फुटबॉलचा प्रचार करणार आहोत. कोची क्लबच्या माध्यमातून तरुणांना चांगले व्यासपीठ दिले जाईल. - सचिन तेंडुलकर