आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Targets 3 Special Records In 199th Kolkata Test

कोलकात्यात सचिन फीव्हर, विंडीजविरुद्ध आजपासून टेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- करिअरमधील 199 वी कसोटी खेळणार्‍या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रंगात इडन गार्डन रंगले आहे. या ठिकाणी बुधवारपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. सचिनची इडन गार्डनवरील ही शेवटची कसोटी आहे. त्यामुळे कोलकात्यासह देशभरात सचिनच्या या कसोटीविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सचिनला निरोप देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कसोटीचे खास आयोजन केले आहे. निरोपाला अविस्मरणीय करण्यासाठी बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) जय्यत तयारी केली आहे.

भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली. आता विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेतही विजयाची ही मोहीम अबाधित ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. फलंदाजीमध्ये शिखर धवन, मुरली विजय चांगली सुरुवात करू शकतात. तसेच चेतेश्वर पुजारा, सचिन, कोहलीकडूनही दमदार फलंदाजीची आशा आहे. मात्र, दुसरीकडे सुमार गोलंदाजी हा भारतीय संघाच्या कर्णधारासाठी चिंतेचा विषय आहे.

सचिन फॉर्मात : भारताच्या 40 वर्षीय सचिनने गतआठवड्यात रणजी सामन्यात नाबाद 79 धावांची खेळी केली. या सामन्यात तो जबरदस्त फॉर्मात होता. यासह त्याने मुंबईला विजय मिळवून दिला. ही लय विंडीजविरुद्ध सामन्यातही सचिन कायम ठेवण्याची आशा आहे. तसेच तो या मैदानावर आपल्या करिअरमधील शेवटच्या कसोटीला अविस्मरणीय करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्याने यासाठी मंगळवारी मैदानावर कसून सराव केला. भारतीय संघ तब्बल सात महिन्यांनंतर कसोटी मालिका खेळणार आहे. या टीमने फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवले होते.

विंडीजची मदार गेल, चंद्रपॉलवर : वेस्ट इंडीज संघ तब्बल दोन वर्षानंतर भारत दौर्‍यावर आला आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये भारताने विंडीजला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने धूळ चारली होती. टीमची मदार ही क्रिस गेल, चंद्रपॉल आणि ब्राव्होवर असेल. वेगवान गोलंदाजीत डॅरेन सॅमी, टिनो बेस्ट, केमार रोच हे त्रिकुट टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. वीरसामीचा भारतीय फलंदाजांना फिरकीत अडकवण्याचा प्रयत्न असेल.

कॅबची घोडचूक धोनीच्या नजरेत : इडन गार्डनवर सचिन तेंडुलकरच्या नावात बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून (कॅब) झालेली घोडचूक कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लक्षात आणून दिली. त्यामुळे लगेच कॅबने मैदानावरील सर्व पोस्टर्स काढून टाकण्याचा आदेश दिला. सचिनच्या नावातील शेवटच्या इंग्रजी अक्षरात एन ऐवजी ई असे करण्यात आले होते.

मैदानावर पाऊल ठेवताच विक्रम
भारतीय संघाच्या सचिन तेंडुलकरने सामन्यागणिक अपूर्व कामगिरी करून असंख्य असे विक्रम नोंदवले आहेत. असाच एक विक्रम आता बुधवारी मैदानावर पाऊल ठेवताच सचिनच्या नावे नोंदवला जाणार आहे. तो आता इडन गार्डनवर सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. त्याने आतापर्यंत 12 कसोटी खेळल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 862 धावा काढल्या आहेत. आता तो या मैदानावर 13 वा कसोटी खेळताना दिसेल. तसे एकाच मैदानावर सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम संयुक्तपणे सुनील गावसकर आणि सचिनच्या नावे आहे.

सचिनकडून शतकाची आशा : दत्त
नवी दिल्ली । कोलकात्याच्या इडन गार्डनवर करिअरमधील 199 वी कसोटी खेळत असलेल्या सचिनकडून आम्हाला शतकाची आशा आहे. त्याने शतक झळकावून या ठिकाणची शेवटची कसोटी अविस्मरणीय करावी, अशी प्रतिक्रिया ऑलिम्पियन कुस्तीपटू योगेश्वर दत्तने दिली. कोलकात्यात बुधवारपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे. ही कसोटी पाहण्यासाठी योगेश्वरसह अमितकुमार दहियादेखील जाणार आहे. ‘मुंबईच्या वानखेडेवर शेवटची कसोटी खेळत असलेल्या लाडक्या सचिनला निरोप देणे हे चाहत्यांसाठी फार कठीण असेल. तब्बल दोन दशकांपेक्षा अधिक काळ चाहत्यांनी सचिनवर जिवापाड प्रेम केले आहे,’ असेही तो म्हणाला.

आता नव्या विक्रमाची संधी
सचिनला इडन गार्डनवर पुन्हा एक नवा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. त्याला अद्याप कोणत्याही एका मैदानावर एक हजार धावा पूर्ण करता आल्या नाहीत. मात्र, आता हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. इडन गार्डनवर एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी सचिनला अद्याप 138 धावांची आवश्यकता आहे. यापूर्वीचा विक्रम व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावे आहे. त्याने दहा सामन्यात 1210 धावा काढल्या आहेत.