आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा सचिनचा सुंदर बंगला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2010...मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या आणि प्रतिष्ठेच्या वसाहतीतील लोकांमध्ये एका नवीन शेजा-याबाबत फार चर्चा होऊ लागली. इतकेच काय, तर त्याच्या आगमनाचीही सर्वांना उत्सुकता लागली होती. पेरिक्रॉस रोडवरून येणा-या-जाणा-या प्रत्येकाचे लक्ष फक्त एकाच घराकडे लागले होते ते म्हणजे... बंगला क्रमांक 19, पेरिक्रॉस रोड, बांद्रा.
लोकांच्या उत्सुकतेचे कारणही तसेच होते, कारण या बंगल्यात कोणी एखादा सामान्य माणूस नव्हे, तर चक्क क्रिकेटचा भगवान...मास्टर ब्लास्टर...लिटल मास्टर अर्थातच तमाम भारतीयांचा लाडका सचिन तेंडुलकर राहायला येणार होता. मग काय... घरात एखाद्या पाहुण्याच्या आगमनासाठी केली जाते तशीच तयारी या भागातील लोकांनी सुरू केली होती. कित्येकांनी तर बांद्र्याच्या रस्त्यांवर सचिनच्या नव्या घरात स्वागताचे पोस्टरही लावून ठेवले होते.
कोट्यवधी चाहते असलेल्याचे घरही कोट्यवधींचेच
सचिन तेंडुलकर केवळ भारतच नव्हे, तर विश्वातील कोट्यवधी लोकांच्या गळ्यातला ताईत आहे. कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या या राजाचे घरही कोट्यवधींचे नसते तरच नवल. पेरिक्रॉस रोडवरील हा बंगला सचिनने तब्बल 39 कोटी रुपयांत खरेदी केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा बंगला एका पारशी परिवाराचा होता. 2007 मध्ये खरेदीची प्रक्रिया पार पडल्यानंतर सचिनने या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले. 9000 फूट आकाराच्या क्षेत्रफळापैकी सुमारे 6 हजार फुटांवर या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सचिनने थोडेथोडके नव्हे, तर सुमारे 40 ते 45 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. एकंदरीतच या बंगल्याला राजाचा महाल बनवण्यासाठी सचिनने 80 कोटी रुपये खर्च केले. हा बंगला एकूण पाच मजल्यांचा आहे; परंतु बंगल्याची उंची जास्त असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार एक मजला भूमिगत ठेवण्यात आला. तळघरात वाहनांची पार्किंग ठेवण्यात आली आहे. सचिनचे कारप्रेम सर्वांनाच ज्ञात आहे. त्याच्याकडे जगातील सर्वांत महागड्या कार उपलब्ध आहेत. उरलेल्या चार मजल्यांपैकी एका मजल्यात जिम, मिनी थिएटर आदी मनोरंजनाची साधने ठेवण्यात आली आहेत. एका मजल्यावर सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या, तर एका मजल्यावर सचिनला आतापर्यंत मिळालेले सर्व पुरस्कार, ट्रॉफी आणि त्याच्या संग्रहातील तमाम वस्तू ठेवण्याची व्यवस्था आहे. संपूर्ण बंगला हायहोल्टेज सीसीटीव्ही सुरक्षा कवचांनी घेरलेला आहे. त्यामुळे या परिसरातून चिटपाखरूही उडाले तरी त्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळते.
100 कोटी रुपयांचा गृहविमा
सचिन तेंडुलकरच्या बंगल्याची जशी चर्चा नेहमी होते तशीच या बंगल्याच्या विमाछत्राचीही नेहमी चर्चा होत असते. क्रिकेटचा राजा सचिनच्या बंगल्याचा विमा थोडाथोडका नव्हे, तर सुमारे 100 कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी त्याला दरवर्षी तब्बल 40 लाख रुपयांचा विमा हप्ता भरणा करावा लागतो. यापैकी 75 कोटी रुपयांचा नुसत्या घराचा, तर 25 कोटी रुपयांचा घरातील वस्तू, फर्निचर आणि क्रिकेटविषयक साहित्याचा विमा आहे. या विमाछत्रात भूकंप, पूर, वादळाचा तडाखा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींसह दहशतवादी हल्ला आदी बाबींचा समावेश आहे.