आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनकाका म्हणाला, तू शूर आहेस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनकाका जेव्हा आम्हाला भेटला, त्या वेळी ना माझा हात प्लॅस्टरमध्ये होता. पण तरीही त्याला भेटायला मिळणार म्हणून मला खूप आनंद झाला होता. त्याने भेटल्यावर लगेच विचारले की हाताला काय झालं? मी त्याला सांगितलं की, क्रिकेट खेळताना पडलो ना, म्हणून हात तुटला. त्यावर सचिनकाका म्हणाला, अरे, मी पण लहान असताना पडलो होतो ना, तेव्हा माझादेखील हात असाच तुटला होता. पण मग पडल्यावर तू रडलास का? मी म्हणालो, नाही. तो म्हणाला, मग तर तू खूप शूर आहेस, मी तर खूप रडलो होतो. निरागस प्रश्नांना तितक्याच निरागसतेने आणि मित्रत्वाच्या नात्याने उत्तर देणारा तो सचिनकाका मुलांचा काका उरलाच नव्हता. तो तर झाला होता, त्यांचा जिवलग मित्र, सखा, यार, दोस्त ... सारं काही.
नाशिकमधील एक कर्णबधिर बालक उमेश भावसार आणि त्याच्यासारख्या शंभरहून अधिक बालकांशी सचिनने मारलेल्या दिलखुलास गप्पांमधील हा एक क्षण होता. सचिन जून महिन्यात नाशकात एका व्यावसायिक कार्यक्रमासाठी आला होता. त्या कामातूनही वेळ काढत त्याने नाशिकच्या माई लेले श्रवण विद्यालयातील कर्णबधिर मुलांशी संवाद साधून त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या होत्या. मात्र, त्या कार्यक्रमाला मुद्दामच सर्वच माध्यमांपासून दूर ठेवण्यात आले होते. त्या वेळी चार भिंतींत झालेल्या त्या कार्यक्रमातील गंमतजंमत आणि सचिनच्या मनाचा मोठेपणा अधोरेखित करणारे त्या गप्पांमधील काही क्षण खास ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी.
सचिनकाका आमच्यासमोर हॉलमध्ये येईपर्यंत आम्हाला खरंच वाटत नव्हतं; पण तो जेव्हा खरोखरच आमच्यासमोर आला व आयोजकांनी आम्हाला त्यांना प्रश्न विचारायला सांगितले, त्या वेळी पहिला नंबर माझाच होता.
मी तर त्याला समोर बघून अशी चकित झाले होते की सगळे प्रश्नच विसरले, अशा शब्दांत विद्या राऊत या बालिकेने त्या प्रसंगाची आठवण सांगितली. रोहिणी वाघ म्हणाली, मी सचिनकाकाला विचारले, तू कधी पिक्चर पाहतोस का? आणि कुठले पाहतोस? त्यावर तो म्हणाला, कधी तरी पाहतो. मराठी, हिंदी, इंग्रजी असे सगळे पाहतो. अनुज बोरकर म्हणाला, मी सचिनकाकाला स्वत:च्या हाताने काढलेले त्याचे चित्र दाखवले, त्याला ते खूप आवडले. तो म्हणाला छान, शाब्बास. तर प्रशांत पायघनने सचिनकाकाला तू आमच्या शाळेत येणार का? असे विचारले. त्यावर सचिनकाका म्हणाला होता, हो, कधी तरी नक्की येईन. मग, मी त्याला विचारले, तुला तुझ्या आचरेकर सरांची आठवण येते का? तर तो म्हणाला, मी प्रत्येक दौ-याच्या आधी त्यांच्या घरी जाऊन त्यांना नमस्कार करतो.
अभिषेक देशमुखने त्याला विचारले, तुला क्रिकेटपटू बनता आले नसते तर काय खेळायला आवडले असते, त्यावर तो म्हणाला, फुटबॉल किंवा टेनिस आणि बॅडमिंटन. वृषभ जैनने त्याला विचारले, तू आम्हाला क्रिकेट खेळायला शिकवशील का? तर तो म्हणाला, हो, नक्कीच. मग त्याने आम्हाला काही फटके मारायच्या अ‍ॅक्शनसुद्धा करून दाखवल्या.
हरलो म्हणून गप्प बसायचे नाही..!
मनीष बडगुजर म्हणाला की, तू जुन्या मॅचेस पाहतोस का ? तर सचिनकाका म्हणाला, हो, नेहमी पाहतो आणि त्यात माझं काय चुकलं त्याचा विचार करतो. त्यानंतर त्याने तू काही वेळा का बरं हरतो, असा सवाल केल्यावर सचिन म्हणाला होता की, खेळात हरलो म्हणून गप्प बसायचे नाही, पुढच्या वेळी जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे.