Home »Sports »From The Field» Sachin Will Play Oneday Cricket Once Again???

सचिन तेंडुलकर पुन्हा वनडे क्रिकेट खेळणार?

दिव्य मराठी वेब टीम | Feb 19, 2013, 17:49 PM IST

  • सचिन तेंडुलकर पुन्हा वनडे क्रिकेट खेळणार?

बेंगळुरु- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याला आदरपूर्वक निरोप देण्यासाठी त्याने एक अंतिम वनडे सामना खेळावा म्हणून त्याला आग्रह करण्यात येत आहे. आयडीएल फाउंडेशन फॉर ब्लाइंडच्या मुलांनी सचिनला आग्रह केला आहे की, सचिनने कमीत कमी एक शेवटचा सामना खेळावा. ज्या सामन्याद्वारे त्याला आदरपूर्वक निरोपसमारंभ देता येईल. मुलांच्या या मागणीवर सचिनने याबाबत विचार करु असे सांगितले आहे. तसेच यासाठी मला थोडा वेळ द्या, असेही सचिनने सांगितले. आता सचिनने बच्चे कंपनीला नाराज करायचे नाही म्हणून बोलले की खरंच त्याला पुन्हा वनडे सामन्यात खेळावे वाटते याबाबत आताच काही सांगता येणार नाही.

चिन्नास्वामी स्टेडिअमवरील प्रशिक्षण शिबीरातील दुस-या दिवशी आयडीएल फाउंडेशन तथा आयडीएल ब्लाईंड बॅंडचे प्रमुख पी. के. पाल यांच्या नेतृत्वाखाली अंध मुलांनी सचिन तसेच कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची भेट घेतली. पाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सचिनने वनडे सामन्यात अचानकपणे निवृत्ती जाहीर केली तो निर्णय ठीक वाटला नाही. सचिन एक महान फलंदाज आहे. त्याला आदराने सन्मान देऊन मैदानातून अलविदा करायला हवे होते. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे आमच्या संस्थेने व मुलांनी सचिनला शेवटचा वनडे सामना खेळावा अशी विनंती केली. त्याद्वारे देशवासिय सचिनला आदरपूर्वक निरोप देऊ शकतील. सचिनने देशांतील नागरिकांसाठी पुन्हा एकदा मैदानात जावे व तेथून निवृत्ती घ्यावी, ही कल्पना उत्तम व योग्य वाटल्याने सचिनला आमच्या मुलांनी विनंती केल्याचे पाल यांनी सांगितले.

Next Article

Recommended