कोची - सचिन तेंडुलकरची फुटब़ॉल टीम केरळ ब्लास्टर्सने सेमीफाइनलच्या पहिल्या टप्प्यात चेन्नईयन एफसीला 3-0 ने पराभूत केले. सेमीफाइनलचा दुसरा टप्पा चेन्नईमध्ये 16 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे फायनलच्या आशा कायम ठेवण्यासाठी चेन्नईला मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे. खराब कामगिरीमुळे
टीम इंडियात समावेश न झालेल्या झहीर आणि युवराजसिंग यांनीही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर सामना पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावली होती.
चेन्नईने लीग मैचमध्ये केरळला 2-1 आणि 1-0 ने हरवले होते. सेमीफायनलच्या पहिल्या टप्प्यात मात्र त्यांना केरळकडून पराभवाचा सामना करावा लागला. सुमारे 61 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये केरळने चेन्नईचा डिफेंस पूर्णपणे तोडला. सचिन तेंडुलकरच्या टीमचा कर्णधार इशफाक अहमदने 27व्या, इयान ह्यूमने 29व्या आणि सुशांत मॅथ्यूने 90व्या मिनिटाला गोल केले. इशफाकने गोल केल्याच्या उत्साहात जर्सी काढली त्यामुळे त्याला यलो कार्ड दाखवण्यात आले.