आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी ट्रॉफीत सेहवाग शेष भारताचा कर्णधार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी वीरेंद्र सेहवागकडे शेष भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. हरभजनसिंग, एस. श्रीसंथ, शमी अहेमद यांना सुद्धा भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. शेष भारत वि. रणजी चॅम्पियन मुंबईचा सामना सहा फेब्रुवारीपासून मुंबईतच वानखेडे स्टेडियमवर रंगेल.

भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय जगदाळे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. बंगळुरू येथे मंगळवारी संघाची निवड करण्यात आली. निवड समितीने शेष भारत, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात खेळणा-या अध्यक्षीय संघ आणि भारतीय ‘अ’ संघाचीही निवड केली.

अध्यक्षीय संघातर्फे अभिनव मुकुंद, रॉबीन उत्थप्पा, अंबाती रायडू यांना संधी मिळाली आहे. परविंदर अवाना, शमी अहेमद यांच्या गोलंदाजीची पाहणी या सामन्याद्वारे होऊ शकेल.
शेष भारत संघातर्फे सलामीवीर सेहवागप्रमाणे हरभजनसिंग यांच्याही फिटनेसची चाचपणी होणार आहे. भारतीय ‘अ’ संघातर्फे मुंबईच्या रोहित शर्माला व धवल कुलकर्णीला संधी देण्यात आली आहे. भारत अ संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे 16 फेब्रुवारी रोजी तीनदिवसीय सराव सामने खेळेल. अध्यक्षीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 व 13 फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय सामन्यात लढेल.

पुजाराला संधी नाही
चेतेश्वर पुजाराला तिन्ही संघांत सामील करण्यात आले नाही. तो मागच्या वर्षी शेष भारत संघाचा कर्णधार होता.
अजून बरेच शिल्लक अजून कारकीर्दीत बरेच काही शिल्लक आहे. मला खूप काही मिळवायचे आहे. भारतासाठी मला अधिकाधिक सामने जिंकायचे आहे, असे मत चेन्नई येथे एका कार्यक्रमात विराट कोहलीने व्यक्त केले.

शेष भारताचा संघ : वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, मनोज तिवारी, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, हरभजनसिंग, एस. श्रीसंत, प्रज्ञान ओझा, ईश्वर पांडे, अभिमन्यू मिथुन, अंबाती रायडू, शमी अहेमद, जलराज सक्सेना.

अध्यक्षीय संघ : अभिनव मुकुंद (कर्णधार), रॉबीन उत्थप्पा, अंबाती रायडू, मनदीपसिंग, केदार जाधव, पार्थिव पटेल, स्ट्युअर्ट बिन्नी, सरबजीतसिंग लड्डा, परवेज रसूल, शमी अहेमद, परविंदर अवाना,
कमलेश मकवाना.

भारत ‘अ’ संघ : शिखर धवन (कर्णधार), जीवनज्योत सिंग, रोहित शर्मा, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, सी. गौतम, राकेश ध्रुव, जलराज सक्सेना, मनप्रीत गोनी, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अशोक मनेरिया.