आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायनाला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत कठीण ड्रॉ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या क्वालिफाइंग लढतीला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. चार लाख डॉलरचे बक्षीस असलेल्या या स्पर्धेत लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल सहभागी झाली आहे. तिला पहिल्या फेरीत कठीण ड्रॉ मिळाला आहे. सायनासह या स्पर्धेत झियान वानदेखील खेळणार आहे. ज्वाला गुट्टा महिला दुहेरीत प्राजक्ता सावंतसोबत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सायना नेहवाल मागील सहा वर्षांपासून खेळत आहे. तिने 2007 मध्ये पहिल्यांदा स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिने 2010 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करताना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मागील दोन वर्षांपासून जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेल्या सायनाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागत आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक विजेती सायना नेहवाल स्पर्धेत थायलंडच्या सापसिरी तेरातानाचाईविरुद्ध लढतीतून विजयी अभियानाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत चार वेळा या दोघींमध्ये लढत झाली. यामध्ये भारताच्या खेळाडूला विजय मिळवता आला.

सलामी सामन्यातील विजयानंतर सायनाची दुस-या फेरीत जपानच्या मिनात्सु मितानीसोबत लढत होईल. फे्रंच ओपन फायनलमध्ये मितानीने सायनाला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्याची तिला संधी आहे. उपांत्यपूर्व लढतीत सायनासमोर झियान वांग किंवा यानजिओ च्यांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
ज्वाला महिला दुहेरीत प्राजक्तासोबत खेळणार - ज्वाला गुट्टा या स्पर्धेत 20 वर्षीय प्राजक्ता सावंतसोबत खेळणार आहे. ज्वाला-प्राजक्ताचा सलामी सामना थायलंडच्या अर्तिमा व पिराया मुंकीतामोर्नविरुद्ध होणार आहे. तसेच मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत ज्वाला-दीजुसमोर पीटर केसबाऊर -इसाबेल हेटरिचचे तगडे आव्हान असेल.
सर्वोत्कृष्ट कामगिरीचा प्रयत्न
ड्रॉ फारच कठीण आहे, स्पर्धेत असेच होतच असते.सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यावर माझा भर असेल. यासाठी मी कसून तयारी केली आहे. सायना नेहवाल, बॅडमिंटनपटू, भारत

सायनाचे असे होतील सामने
पहिली फेरी सायना विरुद्ध सापसिरी तेरातानाचाई (थायलंड)
दुसरी फेरी सायना विरुद्ध मिनात्सू मितानी (जपान)
तिसरी फेरी सायना विरुद्ध झियान वांग किंवा यानजियो च्यांग