Home | Sports | Other Sports | saina-gopichand-togther

सायना, गोपीचंदची दिलजमाई ! ऑलिम्पिक पदकाच्या आशा वाढल्या

विनायक दळवी | Update - Jun 02, 2011, 05:35 AM IST

भारताची बॅडमिंटन ‘स्टार’ सायना नेहवाल आणि तिचे प्रशिक्षक माजी ऑल इंग्लंड विजेते पुल्लेला गोपीचंद यांच्यात नुकतीच दिलजमाई झाली.

  • saina-gopichand-togther

    मुंबई - भारताची बॅडमिंटन ‘स्टार’ सायना नेहवाल आणि तिचे प्रशिक्षक माजी ऑल इंग्लंड विजेते पुल्लेला गोपीचंद यांच्यात नुकतीच दिलजमाई झाली. सायनाला घडविणार्‍या गोपीचंद यांच्यापासून गेले कित्येक महिने ती अंतर राखून होती. गोपीचंद यांचे सहायक भास्कर हेच तिला मार्गदर्शन करीत होते. चीनमध्ये ग्वांसी येथे नुकत्याच झालेल्या सुर्दीमान कप बॅडमिंटन स्पर्धेत सायना-गोपीचंद ही गुरू-शिष्यांची जोडी एकत्र आली.

    त्या दौर्‍यादरम्यान दोघांमधील मतभेद दूर झाले. चीनहून परतलेल्या गोपीचंद यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ती गोष्ट स्पष्ट केली. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद राहिले नाहीत, असे ते म्हणाले. सायना-गोपीचंद यांच्यातील मतभेद दूर झाल्यामुळे लंडन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचे पदक मिळण्याच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कळते की, सायनाला घडविणार्‍या गोपीचंद यांना तिने खेळावर अधिक लक्ष केंद्रित करावे असे वाटते. जाहिरातीच्या शूटिंगसाठी तिने अवाजवी वेळ खर्च करू नये, अशी त्यांची भावना होती. नेमके याच्याउलट घडले. सायनाने कळत-नकळत बर्‍याच जाहिरात एजंटांना जाहिराती शूटिंगसाठी वेळा दिल्या होत्या. त्यामुळे तिच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम विस्कळीत झाला होता. गोपीचंद आणि सायना यांच्यात वितुष्ट आले ते नेमके याच कारणामुळे. मात्र, चीनमधील स्पर्धेने या दोघांना एकत्र आणले. दोघांमधील मतभेद त्या स्पर्धेदरम्यान दूर झाले.

    भास्कर हे सायनाचे सहशिक्षक गेली 5 वर्षे तिच्यासोबत आहेत. भास्कर हेदेखील गोपीचंद यांचेच शिष्य आहेत. हैदराबाद येथे ‘साई’चे प्रशिक्षक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

Trending