आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, सयाका ताकाहाशीचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपेनहेगन- ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायना नेहवाल आणि सिंधूने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सायनाने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत जपानच्या सयाका ताकाहाशीचा पराभव केला. भारताच्या खेळाडूने १०५ मिनिटांच्या रंगतदार लढतीत १४-२१, २१-१८, २१-१२ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला. या लढतीत बाजी मारून सातव्या मानांकित सायनाने स्पर्धेतील आपली विजयी मोहीम अबाधित ठेवली.
निराशाजनक सुरुवातीमुळे सायनाला पहिल्या गेममध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतर तिने दमदार पुनरागमन करून अंतिम आठमधील आपले स्थान निश्चित केले. सातव्या मानांकित सायनाने दुसऱ्या गेममध्ये २१-१८ अशा फरकाने दुसऱ्या गेमममध्ये बाजी मारली. त्यानंतर तिने लढतीत विजयी लय अबाधित ठेवून तिसरी निर्णायक लढत अापल्या नावे केली.

सायना-झुईरुई ली यांच्यात उपांत्यपूर्व सामना रंगणार
महिलाएकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सातवी मानांकित सायना नेहवाल आणि अव्वल मानाकिंत झुई रुई ली समोरासमोर येणार आहेत. या लढतीत विजयाने सायनाला स्पर्धेत आव्हान कायम ठेवता येणार आहे. मात्र, त्यासाठी तिला बलाढ्य लीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. आतापर्यंत सायना आणि झुई रुई ली यांच्यात नऊ वेळा लढती झाल्या अाहेत. चीनच्या ली हानचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. मानांकित झुई रुई लीने अवघ्या २७ मिनिटांत सामना जिंकला. तिने आपली सहकारी ली हानवर २१-१९, २१-१७ अशा फरकाने मात केली. या विजयाच्या बळावर चीनच्या झुई रुईने अंतिम आठमध्ये धडक मारली.
गतस्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिंधूने गुरुवारी महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत रोमहर्षक विजयाची नोंद केली. तिने सहाव्या मानांकित येवोन जू बाईला १९-२१, २२-२०, २५-२३ अशा फरकाने पराभूत केले. यासह तिने अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित केला. अाता सिंधूचा उपांत्यपूर्व सामना दुसऱ्या मानांकित शिजियान वांगशी होईल. वांगला तिसऱ्या फेरीत वॉक ओव्हर मिळाली.