आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Entered Final In Sayyad Modi International Grampri Badminton

सायना नेहवालची सय्यद मोदी आंतरराष्‍ट्रीय ग्रांप्री बॅडमिटनच्या अंत‍िम फेरीत प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अव्वल मानांकित सायना नेहवालने पराभवाची मालिका खंडित करून यंदाच्या सत्रात प्रथमच अंतिम फेरी गाठली. तिने चीनच्या झुआनवर मात करून सय्यद मोदी आंतरराष्‍ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. तिने रोमांचक लढतीत 21-14, 17-21, 21-19 अशा फरकाने विजय मिळवला. मागील मोठ्या सहा स्पर्धांतील अपयशाला सारून तिने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालने 1 तास 20 मिनिटांत महिला एकेरीचा उपांत्य सामना जिंकला. तिने पहिला गेम जिंकून लढतीत आघाडी मिळवली. मात्र, दुस-या गेममध्ये सहाव्या मानांकित झुआनने पुनरागमन केले. तिने दुसरा गेम आपल्या नावे करून लढतीत बरोबरी साधली. मात्र, तिस-या निर्णायक गेममध्ये तिचा सायनासमोर फार काळ निभाव लागला नाही. अव्वल मानांकित खेळाडू सायनाने 21-19 ने रंगतदार गेम जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
सिंधूची फानेत्रीवर मात
जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्य लढतीत लिडावेनी फानेत्रीला 62 मिनिटांत पराभूत केले. दुस-या मानांकित सिंधूने 21-6, 12-21, 21-17 ने सामना जिंकला.
श्रीकांत फायनलमध्ये
के. श्रीकांतने भारताचा युवा खेळाडू एच. एस. प्रणवला पराभूत केले. त्याने 21-18, 22-20 अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला. त्याने अवघ्या 50 मिनिटांत सातव्या मानांकित प्रणववर मात केली.