सिडनी - सलग पराभवाची मालिका खंडित करून सायना नेहवाल आता ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील किताबापासून अवघ्या एका पावलावर येऊन ठेपली आहे. तिने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या शिजियान वांगवर 21-19, 16-21, 21-15 ने सनसनाटी विजय मिळवला. सायनाने 76 मिनिटांमध्ये सामना जिंकला.
वांगचा धक्कादायक पराभव :
सायना नेहवालने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये 21-19 अशा फरकाने बाजी मारली. यासह तिने आघाडी घेतली. मात्र, दुसर्या गेममध्ये वांगने दमदार पुनरागमन केले. तिने 21-16 ने दुसरा गेम जिंकून लढतीत बरोबरी साधली. मात्र, तिला तिसर्या निर्णायक सेटमध्ये आपली विजयी लय अबाधित ठेवता आली नाही. सरस खेळी करताना सायनाने तिसरा गेम जिंकून सामना आपल्या नावे केला. यासह तिने अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.
सायनाचा पाचवा विजय
सहावी मानांकित सायना आणि अव्वल मानांकित शिजियान वांग यांच्यात आतापर्यंत सात लढती झाल्या. यात सायनाने पाच विजय मिळवले आहेत. यासह तिने वांगविरुद्धचा आपला दबदबा कायम ठेवला.