आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal, Kidambi Srikanth Lead Indian Challenge In Hong Kong Open Super Series

सायना, श्रीकांतचे ‘हाँगकाँग ओपन’लक्ष्य; हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा अाजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग: चीन ओपनचे चॅम्पियन सायना नेहवाल आणि के. श्रीकांतची नजर आता हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या किताबाकडे आहे. मंगळवारपासून या सुपर सिरीजला प्रारंभ होणार आहे. जागतिक चॅम्पियनशिपमधील दोन वेळची कांस्यपदक विजेती सिंधू या स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारताचे स्टार खेळाडू साडेतीन लाख डॉलरचे बक्षीस असलेल्या या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत नशीब आजमावणार आहेत.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सायना नेहवाल व युवा खेळाडू श्रीकांतने रविवारी चीन ओपनचे विजेतेपद जिंकून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. आता हाँगकाँग ओपनमध्येही या विजयाचा कित्ता गिरवण्याचा या चॅम्पियन खेळाडूंचा प्रयत्न असेल.
राष्ट्रकुलचा चॅम्पियन पी. कश्यप पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचा सलामी सामना थायलंडच्या तांगोनसाक बुनसाकशी होईल. थायलंडच्या खेळाडूला नमवून दुसरी फेरी गाठण्याचा कश्यपचा प्रयत्न असेल. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताची सिंधू आणि थायलंडची बुसान समोरासमोर असतील.

याशिवाय २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा महिला दुहेरीत नशीब आजमावणार आहेत. त्यापाठोपाठ मनू अत्री आणि सुमीत रेड्डी आव्हान सादर करणार आहेत.
तिएन चेन- श्रीकांत झुंज
भारताच्या श्रीकांतला आपल्या विजेतेपदाच्या मोहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी आहे. श्रीकांतचा पुरुष एकेरीचा सलामी सामना सातव्या मानांकित चो तिएन चेनशी होईल. या वेळी तैपेईच्या या खेळाडूला चीन ओपनच्या विजेत्या खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.