आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal News In Marathi, All England Badminton Championship

ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप: सायना विजयी; सिंधूचे पॅकअप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपला दमदार विजयाने सुरुवात केली. मात्र, जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेती युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूला स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. तिला सलामी लढतीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला.


जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सायनाने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा पराभव केला. तिने सरळ दोन गेममध्ये 21-15, 21-6 अशा फरकाने सामना जिंकला. यासह भारताच्या खेळाडूने अवघ्या 32 मिनिटांत दुसर्‍या फेरीतील प्रवेश निश्चित केला. याशिवाय सायनाने क्रिस्टीला सलग दुसर्‍यांदा धूळ चारली. यापूर्वी गतवर्षी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने स्कॉटलंडच्या खेळाडूला पराभूत केले होते. आता सातवी मानांकित सायना नेहवाल आणि अमेरिकेची बेइवेन झांग महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत समोरासमोर असतील.


सायनाचा सहज विजय
पहिला गेम : सायनाने दमदार सुरुवात केली. तिने तीन गुणांची कमाई करताना 3-1 ने आघाडी मिळवली. त्यानंतर घेतलेली आघाडी तिने शेवटपर्यंत कायम ठेवली. सलग पाच गुण मिळवून पहिला गेम 21-15 ने आपल्या नावे केला.
दुसरा गेम : यात स्कॉटलंडच्या खेळाडूने सपशेल पराभव पत्करण्याचे संकेत दिले. याचा फायदा घेत सायनाने सलग गुणांची कमाई करत तिने दुसरा गेम 21-6 ने जिंकला.


एकट्या सायनाकडून आशा
ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील भारताच्या सर्वच खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता केवळ सायना नेहवालकडून पदकाची आशा केली जात आहे. युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच पुरुष एकेरीत आनंद आणि पी.कश्यपही स्पर्धेतून बाहेर पडले. के. श्रीकांतलाही स्पर्धेत फार काळ आव्हान कायम ठेवता आले नाही.


पदार्पणात सिंधूची झुंज अपयशी
जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेली पी. व्ही. सिंधू करिअरमध्ये प्रथमच ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनमध्ये सहभागी झाली होती. पदार्पणात दमदार सुरुवात करण्यासाठी तिने दिलेली झुंज अपयशी ठरली. तिला सलामी सामन्यात चीनच्या सुन यू ने पराभूत केले. तिने 21-16, 21-15 अशा फरकाने सामना जिंकला. यासह सिंधूचे 47 मिनिटांत स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.