आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal News In Marathi, Commonwealth Game, Divya Marathi

जखमी सायना नेहवालची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या राष्‍ट्रकुल स्पर्धेच्या तोंडावरच भारतीय बॅडमिंटन संघाला जबर धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायना नेहवालने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. तिने पायाच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत सायनाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र तरीही तिने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून सत्रातील दुस-या किताबावर नाव कोरले. या स्पर्धेतून तिला फॉर्मही गवसला आहे. त्यामुळेच राष्‍ट्रकुल स्पर्धेतही सायनाकडून मोठ्या कामगिरीची आशा होती.

‘ऐन वेळी हा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. मात्र माझ्या दृष्टीने याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळेच मोठ्या धाडसाने मी हा निर्णय जाहीर केला. माझ्या अनुपस्थितीत भारतीय संघ निश्चितपणे स्पर्धेत चांगले यश संपादन करेल. पायाला झालेली दुखापतही अधिक गंभीर आहे. त्याचा परिणाम मला आगामी स्पर्धेतही भोगावा लागेल. यासाठी हा निर्णय घेत आहे,’ अशी प्रतिक्रिया सायनाने दिली.

भारतीय बॅडमिंटन संघाला राष्‍ट्रकुल स्पर्धेत तिसरे मानांकन मिळाले आहे. दहा सदस्यीय भारतीय संघ स्पर्धेत सहभागी होत आहे.

सायनाचे सोनेरी यश
राष्‍ट्रकुल स्पर्धेतील सायना नेहवालची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. तिने गत 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या वोंग म्युवर मात करून हे सोनेरी यश संपादन केले होते.

आता सिंधूवर मदार
जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिंधूवर आता भारतीय महिला संघाची मदार असेल. तिच्यासोबत युवा खेळाडू पी. सी.तुलसीचाही समावेश आहे. ही जोडी महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील. तसेच ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा ही जोडी महिला दुहेरीत नशीब आजमावणार आहे.