आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियन ओपन सायनाचा धमाका सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर विराजमान झालेल्या भारताच्या सायना नेहवालला उपांत्यपूर्व फेरीत अत्यंत कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. चीनच्या सून यू हिला तीन गेमच्या सामन्यात पराभूत करत उपांत्य फेरी गाठलेल्या सायनाला उपांत्य फेरीतदेखील चीनच्याच जुईरुईशी लढावे लागणार आहे. जुईरुईबराेबर यापूर्वी झालेल्या दहा सामन्यांतील आठ सामने सायनाने गमावले असल्याने या लढतीत सायनाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत सायनाला चीनच्या सून यू हिनेदेखील कडवी झुंज दिली. सून यूविरुद्धच्या पहिल्या गेममध्ये सायनाने दमदार खेळ करत तो गेम २१-११ असा सहजपणे जिंकला. त्यात सायनाने प्रारंभापासूनच १२-४ अशी बढत घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राखण्यात तिला यश आले.
मात्र, दुसऱ्या गेमपासून सूनने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत दमदार पुनरागमन केले. या गेममध्ये तिने प्रारंभी ७-१ अशी आघाडी घेतली होती. ती आघाडी वाढवत १४-८ अशी केल्यामुळे दुसरा गेम सायनाला १८-२१ असा गमवावा लागला. तिसरा गेमदेखील प्रचंड चुरशीचा झाल्यानंतर सायनाने तिचा संपूर्ण अनुभव पणाला लावला.

प्रारंभी ५-१ अशी आघाडी घेतल्यानंतर सायनाने उत्कृष्ट स्मॅशेसचा उपयोग करत ११-३ पर्यंत ही आघाडी वाढवली. मात्र, त्यानंतर सूनने जोरदार मुसंडी मारत १५-१४ अशी स्थिती आणली. रोमांचक लढतीत एकवेळ तर सूनने १७-१६ अशी आघाडीदेखील घेतली. त्यानंतर मात्र सायनाने तिच्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करीत गेम २१-१७ असा जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑल इंग्लंडमध्येदेखील सायनाने सूनला पराभूत केले असल्याने तो आत्मविश्वास तिला उपयोगी पडला.

शिजिआनची नोजोमीवर मात

आणखी एका उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या वांग शिजिआनने जपानच्या नोजोमी ओकुहारा हिचा १ तास ५१ मिनिटे चाललेल्या लढतीत अगदी अल्पशा फरकाने पराभव केला. या दीर्घकाळ चाललेल्या लढतीत शिजिआनने नोजोमीला पहिल्या गेममध्ये २१ -१९ असे पराभूत केले, तर दुसऱ्या गेममध्ये नोजोमीने उलटफेर करत १५-२१ असा विजय मिळवला. तिसरा गेम तर प्रचंड संघर्षपूर्ण ठरला. त्यात शिजिआनने नोजोमीला २२-२० असे निसटत्या फरकाने पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली आहे.
वांग यिहान पराभूत

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या जुईरुईने चीनच्याच वांग यिहानला संघर्षपूर्ण लढतीत पराभूत केले. ५५ मिनिटे चाललेल्या या लढतीत जुईरुईने पहिला गेमदेखील गमावला होता. मात्र, त्यानंतर तिने तिचा आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ करत सामना १४-२१, २१-१५, २१-१२ असा खिशात घातला.
जुईरुई देणार कडवे आव्हान

ऑल इंग्लंडचे विजेतेपद पटकावत सायना जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर विराजमान झालीय. त्या वेळी तिने प्रथम क्रमांकावरील जुईरुईलाच खाली ढकलले आहे. त्यामुळे उपांत्य सामन्यात जुईरुई त्याचा बदला घेण्यासाठी जिवाचे रान करून कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. त्यातच सायनाचे जुईरुईशी असलेले ट्रॅक रेकॉर्डदेखील समाधानकारक नाही. १० पैकी ८ लढती जुईरुईने, तर अवघ्या २ लढतीत सायनाने विजय मिळवला होता. त्यामुळे ही लढत जिंकणे हा सायनासाठी एक मानसिक अडथळा दूर करण्यासह मीच पहिल्या क्रमांकाची दावेदार असल्याचे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा सामना आहे. अर्थात, ही दुसरी चिनी भिंत ओलांडण्याचे जबरदस्त आव्हान सायना नेहवालपुढे असणार आहे.