आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Storms Into Malaysia Open Quarterfinals

मलेशियन ओपन बॅडमिंटन : सायना अंतिम आठमध्ये, ज्वाला, कश्यप, प्रणयचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल गुरुवारी अधिकृतरीत्या जगातली नंबर वन खेळाडू बनली. याचा जल्लोष तिने चीनच्या याओ जुईला २१-१३, २१-९ ने पराभूत करत साजरा केला. या विजयासह तिने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. सायना अंतिम आठमध्ये पोहोचली, मात्र पुरुष एकेरीत एच. एस. प्रणय आणि परुपल्ली कश्यप तसेच महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.
सायनाने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात याओ जुईला अवघ्या ३० मिनिटांत हरवले. तिच्यासमोर आता क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या सुन यू हिचे आव्हान असेल. इतर एका सामन्यात सुन यू हिने अमेरिकेच्या बेईवेन झांगला २१-१७, २०-२२, २१-१७ ने हरवले. या वर्षी सय्यद मोदी आणि इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या सायनाने गुरुवारी दोन्ही गेममध्ये चिनी खेळाडूला सावरण्याची एकही संधी दिली नाही.
शानदार फॉर्मात असलेल्या सायनासमोर चिनी खेळाडूने पहिल्या गेममध्ये थोडा संघर्ष केला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये तर तिने पूर्ण समर्पण केले. जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या एच. एस. प्रणयला दोन वेळेसचा ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लिन दानसमोर आव्हान देता आले नाही. जागतिक क्रमवारीत तिसरा आणि स्पर्धेतील पाचवा मानांकित डॅनने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत बिगर मानांकित प्रणयला ५२ मिनिटांत २१-१५, २१-१४ ने हरवले. तत्पूर्वी, पी. कश्यपचा अव्वल मानांकित चीनच्या चेन लोंगकडून २१-१०, २१-६ असा एकतर्फी लढतीत पराभव झाला.
ज्वाला-अश्विनी पराभूत

महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचा सुमार फॉर्म कायम राहिला. भारतीय जोडीने जवळपास एक तास संघर्ष केला. मात्र, सहाव्या मानांकित इंडोनेशियाच्या नित्या माहेश्वरी आणि ग्रेसिया पोली यांनी ५८ मिनिटांत भारतीय खेळाडूंना २१-२३, २१-८, २१-१७ ने हरवले.