आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina's Target To Win, From Today Denmark Open Super Series Starts

सायनाची नजर किताबाकडे , डेन्मार्क ओपन सुपर सिरीज आजपासून सुरू होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडेन्स - डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली सायना नेहवाल, अर्जुन पुरस्कार विजेती पी. व्ही. सिंधू, पी. कश्यप, के.श्रीकांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या किताबावरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिला स्पर्धेत चौथे मानांकन मिळाले आहे. सायनाचा सलामी सामना बुधवारी बल्गेरियाच्या स्टेफनी स्तोवाशी होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सौरभ वर्मासह आनंद पवार, एच. एस. प्रणय आणि के. श्रीकांत यांचे सामने होणार आहेत. पुरुष एकेरीत भारताच्या सौरभला चौथे मानांकन देण्यात आले.
‘मी मागील वर्षी डेन्मार्क ओपनचे अजिंक्यपद जिंकले होते. आता या अजिंक्यपदवरचे वर्चस्व कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. मात्र, हे माझ्यासाठी सोपे नाही. यासाठी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मी सज्ज आहे,’ असेही सायना नेहवाल म्हणाली.


सायनाची नजर सत्रातील पहिल्या विजेतेपदाकडे लागली आहे. मागील सहा महिन्यांपासून पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या सायनाला या वर्षी अद्याप एकेरीचे एकही विजेतेपद जिंकता आले नाही. मात्र, तिने गत ऑगस्टमध्ये चांगली कामगिरी करताना हैदराबाद बीट्सला पहिल्या आयबीएलचे अजिंक्यपद जिंकून दिले. ही लय डेन्मार्क येथील स्पर्धेतही कायम ठेवण्याचा तिचा प्रयत्न असेल. तब्बल दीड महिन्यानंतर सायना आता मोठ्या स्पर्धेत सहभागी होत आहे. यापूर्वी, ती आयबीएलमध्ये सहभागी झाली होती. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेली सिंधू, पी. कश्यप, गुरुसाई दत्त, आनंद पवार, के. श्रीकांतदेखील जबरदस्त फॉर्मात आहेत.


पॅचअपनंतर ज्वाला-अश्विनी एकत्र
मागील वर्षी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ज्वाला आणि अश्विनी पोनप्पा यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे दोघींनी एकत्र न खेळण्याचा निर्णय घेतला होता.मात्र, मागील काही महिन्यांमध्ये त्यांच्यात पुन्हा पॅचअप झाले. लंडन ऑलिम्पिकनंतर प्रथमच ही जोडी महिला दुहेरीत एकत्र खेळताना दिसणार आहे. अश्विनी-ज्वालाचा पहिला सामना महिला दुहेरीची जगातील नंबर वन जोडी झिआयोली वांग-यू यांगशी होईल. यामुळे भारताच्या जोडीला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.


स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडू
सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, अरुंधती पानतावणे, पी. कश्यप, अजय जयराम, के. श्रीकांत, एच. एस. प्रणय, सौरभ वर्मा, गुरुसाई दत्त, मनू अत्री, बी. सुमीत रेड्डी, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, तरुण कोन.


सिंधूकडून पदकाची आशा
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूकडून महिला एकेरीत किताबाची आशा केली जात आहे. तिने नुकत्याच ऑगस्टमध्ये झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये उपविजेत्या लखनऊ अवध वॉरियर्सकडून समाधानकारक कामगिरी केली. डेन्मार्क ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सिंधूची सलामी लढत जपानच्या एरिको हिरोसेशी होईल.


ज्वालाकडे सर्वांची नजर
भारतीय बॅडमिंटन महासंघाविरुद्ध (बीएआय) बंड पुकारणा-या ज्वालाकडे सर्वांची नजर असेल. बीएआयने इंडियन बॅडमिंटन लीगमधील गैरवर्तनप्रकरणी ज्वालावर आजीवन बंदीची शिफारस केली होती. मात्र, याविरुद्ध तिने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. हे प्रकरण सध्या तरी थंडावले आहे.ऑलिम्पिकनंतर प्रथमच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या ज्वालाकडून खेळीची आशा आहे.


अरुंधतीसमोर तगडे आव्हान
नागपूरची स्टार खेळाडू अरुंधती पानतावणे महिला एकेरीत नशीब आजमावणार आहे. मात्र, तिचा या स्पर्धेतील मार्ग फार कठीण आहे. अरुंधतीला सलामी सामन्यात जगातील नंबर वन ली झुइरुईच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. चीनच्या ली ला या स्पर्धेतील किताबाची प्रबळ दावेदार मानले जाते. त्यामुळे पहिल्या फेरीतील मोठा अडसर दूर केल्यास अरुंधतीला फायनलमध्ये सहज मजल मारता येईल.