आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी चितलांगे वर्ल्ड चॅम्पियन, जागतिक हौशी बुद्धिबळ स्पर्धा; 85 हजारांचे बक्षीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिंगापूर येथे झालेल्या जागतिक हौशी बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचे औरंगाबादची युवा बुद्धिबळपटू साक्षी चितलांगेने (7 गुण) विजेतेपद पटकावले. तिने पुण्याच्या सलोनी सापळेला अर्ध्या गुणाने मागे टाकून ही कामगिरी साधली. सलोनीला 6.5 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अशी कामगिरी करणारी साक्षी महाराष्ट्रातील दुसरी खेळाडू ठरली आहे.
साक्षीने या स्पर्धेत नऊ फेर्‍यांमध्ये सात गुणांची कामाई केली. नऊपैकी तिने सहा लढतींत विजय मिळवला आणि दोन लढतींत बरोबरी साधली. एका लढतीत तिला पराभव सहन करावा लागला. साक्षीने अखेरच्या फेरीत महाराष्ट्राच्याच अपराजिता गोच्चीकर हिच्याविरुद्ध बरोबरी राखून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाचे लक्ष्य वेधले. यात सम्मद शेटे (7 गुण), नितीश बेलूरकर (6 गुण), प्रणव पाटील (4 गुण) यांचा समावेश आहे.
विजेत्या साक्षी चितलांगेचे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर सावे, सचिव हेमेंद्र पटेल यांनी अभिनंदन केले.
ऋत्विक विजेता
सागर चेस अकादमीतर्फे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे ऋत्विक गढियाने विजेतेपद पटकावले. हर्ष मंडोरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऋत्विकने 9 पैकी 9 गुण आणि हर्षने 9 पैकी 7 गुण मिळवत स्पर्धेत बाजी मारली. प्रवण तुंगीकरने 6 गुणांसह तिसरे, आर्थ अग्रवालने चौथे, सिया सागरने (5.5 गुण) पाचवे आणि मंदार इंगळेने सहावे स्थान मिळवले. स्पर्धेतील विजेत्या पहिल्या सहा खेळाडूंना डॉ. पंकज अग्रवाल यांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
सानी, सुधांशू चमकले
नाशिक येथे झालेल्या अकरा वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या सानी देशपांडे आणि सुधांशू निकमने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत त्यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला. या दोघांना ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. स्पर्धेत मुलांच्या गटात अग्रमानांकित संकर्षण शेळके आणि मुलींमध्ये दिव्या देशमुख हिने प्रथम क्रमांक पटकावला. मुलींमध्ये जान्हवी कौशिक, सिया कुलकर्णी, सृष्टी राका, वृंदा राठीने उत्कृष्ट कामगिरी केली.