टोकियो - अव्वल मानांकित
सानिया मिर्झाने
आपली सहकारी झिम्बाव्वेच्या कारा ब्लॅकसोबत शनिवारी डब्ल्यूटीए टोरी पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब जिंकला. या जोडीने अंतिम सामन्यात स्पेनच्या गार्बिने मुगुरुझा आणि कार्ला सुआरेझचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. सानिया-काराने ६-२, ७-५ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. या वेळी चॅम्पियन जोडीचा १ लाख डॉलर आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. नुकताच सानियाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. अव्वल मानांकित जोडीने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये सोपा विजय संपादन केला.
वोज्नियाकी, अॅना फायनलमध्ये
कॅरोलिना वोज्नियाकी आणि जगातील माजी नंबर वन अॅना इव्हानोविकने महिला एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. डेन्मार्कच्या वोज्नियाकीने उपांत्य लढतीत स्पेनच्या गार्बिने मुगुरुझाचा पराभव केला. तिने लढतीत ६-४, २-६, ६-२ अशा फरकाने रोमहर्षक विजय संपादन केला. तसेच सबिर्याच्या अॅना इव्हानोविकने उपांत्य लढतीत जर्मनीच्या केर्बरवर ७-५, ६-३ ने मात केली.