औरंगाबाद - भारतीय संघाला आशियाई स्पर्धेत सांघिक आणि महिला एकेरीत पदक मिळवून देण्यासाठी मी प्रचंड मेहनत केली. त्यासाठी बलाढ्य संघातील खेळाडूंविरुद्ध मोठ्या कसोशीने लढाही दिला. मला पदकांपर्यंत मजल मारता आली. मात्र, या अपयशानंतरही केलेल्या अथक परिश्रमावर मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया भारतातील माजी नंबर वन टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकरने दिली. सहा महिन्यांच्या अल्पावधीतील मेहनतीतून आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप, ग्लासगो राष्ट्रकुल आणि इंचियोन आशियाई स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली,’असेही मधुरिकाने या वेळी दैनिक ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.
चीन, सिंगापूरविरुद्ध शर्थीची झुंज
आशियाई स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत आम्ही जगातील दिग्गज चीन, सिंगापूर आणि मलेशिया संघाविरुद्ध शर्थीची झुंज दिली. या संघातील खेळाडूंविरुद्ध दिलेल्या लढतीनंतर माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. काही सामन्यात सनसनाटी यश, तर काही सामन्यांमध्ये धक्कादायक पराभवालाही सामोरे जावे लागले. मात्र, त्यामुळे बरेच काही शिकता आले,’ असेही मधुरिकाने नमूद केले.
नंबर एकसाठी चौघींमध्ये झुंज
भारतातील नंबर वन स्थानासाठी ठाण्याच्या मधुरिका पाटकरसह पूजा सहस्रबुद्धे, अंकिता दास आणि पौलमी घटक यांच्यात झुंज रंगणार आहे. सध्या इंदूर येथे रॅकिंगसाठी टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील किताबासह खेळाडूला अव्वलस्थानावर विराजमान होण्याची संधी आहे. सध्या महिला एकेरीत पौलमी अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्यापाठोपाठ पूजा दुस-या स्थानी आहे. तसेच अंकिता तिस-या आणि माजी नंबर वन मधुरिका ही चौथ्या स्थानावर आहे.