आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second One Day Match Play Today Between India And West Indies, Divya Marathi

भारताची परीक्षा! भारत-वेस्ट इंडीज दरम्यान दुसरा वनडे सामना आज रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: शनिवारी होणा-या दुस-या वनडेच्या पूर्वसंध्येला भारताचा धोनीने गोलंदाजीचा सराव केला. इन्सेट : सराव करताना विंडीजचे खेळाडू.
नवी दिल्ली - यजमान भारतीय संघ शनिवारी वेस्ट इंडीजविरुद्ध दुस-या लढतीत विजय मिळवून पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर मालिकेतील दुस-या सामन्यात शनिवारी भारत-वेस्ट इंडीज संघ समोरासमोर असतील. सलामी सामन्यात शानदार विजय मिळवून पाहुण्या विंडीज संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

कोची येथे झालेल्या सलामी सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील सुमार कामगिरीने पराभवाची धूळ चाखली. मात्र, आता दुस-या सामन्यात विजय मिळवून या पराभवाची परतफेड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
विश्वविजेता भारतीय संघाने तब्बल वर्षभराच्या अंतराने घरच्या मैदानावर होत असलेल्या मालिकेत आपले वर्चस्व पणाला लावले आहे. दुसरीकडे आयसीसीच्या वनडे क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या विंडीज टीमकडे गमावण्यासारखे काहीही नाही.

आठ वर्षांपासून वर्चस्व
दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर मागील आठ वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयाची पताका फडकत आहे. सलगच्या शानदार विजयासह भारताने या मैदानावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मार्च २००६ पासून आजतागायत या मैदानावर भारताने एकही वनडे गमावला नाही. २००६ मध्ये भारताने इंग्लंडला ३९ धावांनी धूळ चारली होती.

विंडीज संघ फॉर्मात
सलामी सामन्यातील शानदार विजयाने पाहुणा विंडीज संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. हाच विजयाचा फॉर्म सलग दुस-या सामन्यातही कायम ठेवण्याचा या कॅरेबियन टीमचा प्रयत्न असेल. यासाठी या संघाने दोन दिवसांमध्ये कसून सराव केला. सॅम्युअल्स आपल्या शतकी खेळीची लय दिल्लीच्या कोटलावरही कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील.

मोहित बाहेर; ईशांतला संधी
जखमी मोहित शर्माच्या जागी आता मालिकेतील उर्वरित सामन्यात ईशांत शर्मा खेळणार आहे. गंभीर दुखापतीमुळे मोहितला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी ईशांतला संघात सहभागी करण्यात आले आहे. आशिया कप, इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेनंतर ईशांतला पुनरागमनाची संधी मिळाली आहे.

१९८९ नंतर प्रथमच संघ समोरासमोर
१९८९ नंतर प्रथमच फ‍िरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि विंडीज संघ समोरासमोर येणार आहेत. यापूर्वी २३ ऑक्टोबर १९८९ रोजी या दोन्ही संघांत सामना रंगला होता. या वेळी विंडीजने भारतावर २० धावांनी मात केली होती. आता याच पराभवाची परतफेड करण्याची भारताला संधी आहे.