आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Test: Australia Defeated India By 4 Wickets

टीम इंडिया गाबावरही अपयशी ! यजमान ऑस्ट्रेलियाची भारतावर ४ विकेटने मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - ऐतिहासिक सुरुवातीनंतरसुद्धा टीम इंिडया गाबा कसोटीत अपयशी ठरली आहे. भारताने सामन्याच्या पहिल्या दिवशी ३०० पेक्षा अधिक धावा काढून रेकॉर्ड केला होता. तिस-या दिवशी भारताला मोठ्या आघाडीची संधी होती. मात्र, जसजसा सामना पुढे गेला तसतशी ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली. कांगारूंनी चौथ्या दिवशीच सामना जिंकला. यजमान संघाने शनिवारी भारतावर ४ गड्यांनी विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणा-या स्टीव्हन स्मिथने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्याने १३३ धावांची खेळी केली. मालिकेतील तिसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये होईल.

सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने १ बाद ७१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताची सुरुवात शुक्रवारचे नाबाद फलंदाज शिखर धवन आणि पुजारा यांना करायची होती. मात्र, धवन जखमी होता. यामुळे पुजारासोबत विराट कोहली मैदानावर उतरला. हा बदल कोहलीला जमला नाही. तो अवघी एक धाव काढून बाद झाला. यानंतर जणू काही भारतीय फलंदाजांनी मैदानावर फक्त हजेरी लावण्याचे काम केले. पुढच्या ४१ धावा काढताना भारताच्या ५ विकेट गेल्या. १ बाद ७५ अशी स्थितीत असलेला भारतीय संघ ६ बाद ११७ धावा असा संकटात सापडला. कोहलीनंतर अजिंक्य रहाणेने (१०) हजेरी लावली. रोहित शर्मा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना तर भोपळाही फोडता आला नाही. अश्विनने १९ धावांचे योगदान दिले. जखमी धवनसुद्धा नंतर मैदानावर उतरला. त्याने उमेश यादवसोबत (३०) भारताचा स्कोअर २०० च्या पुढे पोहोचवला. मात्र, तो बाद झाल्यानंतर भारताचा डाव अवघ्या २२४ धावांत आटोपला.

ऑस्ट्रेलियाने सहज लक्ष्य गाठले
ऑस्ट्रेलियाला अवघ्या १२८ धावांचे लक्ष्य मिळाले. यजमान संघाने हे लक्ष्य २३.१ षटकांत गाठले. हे लक्ष्य गाठताना ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी यजमानांचे सहा गडी बाद केले. आपल्या फलंदाजांनी आणखी थोडा संघर्ष केला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर क्रिस रोजर्सने अर्धशतकी खेळी करताना ५५ धावा काढल्या. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (६), शेन वॉटसन (०) हे दोघे अपयशी ठरले. कर्णधार स्मिथने २८, तर शॉन मार्शने १७ धावांचे योगदान दिले.

रोहितकडून निराशा
रोहित शर्मा विदेशी मैदानावर फलंदाजीत पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात ३२ धावा काढल्या. मात्र, नंतर तो मोठी खेळी करू शकला नाही. दुस-या डावात त्याची कामगिरी आणखी सुमार ठरली. त्याला भोपळासुद्धा फोडता आला नाही. बाऊन्सी खेळपट्ट्यांवर रोहितचे तंत्र पुन्हा एकदा सुमार दर्जाचे ठरले.

हेही आहे महत्त्वाचे
*स्मिथच्या नावे ११ कसोटीत ६१.१२ च्या सरासरीने ९७८ धावा झाल्या. यात त्याने ५ शतके आणि दोन अर्धशतके ठोकली.
*स्मिथने कारकीर्दीत दुस-यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला.
*कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा स्मिथ नववा खेळाडू ठरला आहे.
*महेंद्रसिंग धोनी कसोटीत दहाव्यांदा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुस-यांदा शून्यावर बाद झाला. कसोटीत कर्णधार आणि यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक ८ वेळा शून्यावर बाद होण्याचा वाईट रेकॉर्ड त्याच्या नावे झाला आहे.
*चेतेश्वर पुजाराने आपल्या ४३ धावांच्या खेळीत कसोटीत २ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याच्या नावे २६ कसोटीत ४८.२६ च्या सरासरीने २०२७ धावा झाल्या आहेत.
ड्रेसिंग रुममध्ये गोंधळ
चौथ्या दिवशी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये गोंधळ उडाला. पुजारासोबत फलंदाजीला कोण जाणार, धवन की कोहली ? ..काहीच कळत नव्हते, असे धोनीने सांगितले. सामन्यापूर्वी सरावादरम्यान धवन जखमी झाला होता. नंतर त्याच्या वेदना वाढल्या. कोहलीला सज्ज होण्यास थोडा वेळ लागल्याने गोंधळ उडाला.

असे बदलले सामन्याचे चित्र
पहिला दिवस भारताचा : ५४ वर्षांत प्रथमच एखाद्या संघाने गाबावर पहिल्या दिवशी ४ बाद ३११ धावा काढल्या होत्या. भारताला याचा फायदा झाला नाही.
दुसरा दिवस ५०-५० : टीम इंडियाचा डाव ४०८ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलिया ४ बाद २२१ धावा.
तिसरा दिवस ऑस्ट्रेलियाचा : ५ बाद २४७ अशा स्थितीनंतरसुद्धा ऑस्ट्रेलियाने ५०५ धावा काढल्या. भारताविरुद्ध ९८ धावांची आघाडी घेतली.
चौथा दिवस, भारताचे समर्पण : १ बाद ७५ अशा स्कोअरवरून भारतीय संघ ६ बाद ११७ असा संकटात सापडला. २२४ धावांवर सर्वबाद. ऑस्ट्रेलिया विजयी.