ब्रिस्बेन - भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून दुस-या कसोटीला सुरुवात होत आहे.
टीम इंडिया मालिकेत १-१ ने बरोबरी करण्याच्या लक्ष्याने मैदानावर उतरेल. शिवाय येथील गाबाच्या मैदानावर भारताने कधीही कसोटी सामना जिंकलेला नाही. येथे पराभवाचा शिक्का पुसण्याच्या इराद्याने भारतीय खेळाडू खेळतील. भारताने फक्त एक वेळेस २००३ मध्ये कसोटी ड्रॉ करण्यात यश मिळवले होते. दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत २-० ने आघाडी करण्याच्या लक्ष्याने खेळेल.
भारतासाठी जमेची बाजू म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात पुनरागमन करत आहे. गाबाच्या खेळपट्टीवर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला नसला, तरीही धोनीने येथे चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे. धोनी म्हणाला, "मला वेगवान आणि चेंडू उसळणा-या खेळपट्टीची अडचण नाही. तुम्ही येथील रेकॉर्ड बघितला तर गाबात आम्ही एकही सामना जिंकलेला नाही. मात्र, यामुळे फरक पडत नाही. आम्ही जोहान्सबर्ग आणि पर्थसारख्या वेगवान खेळपट्ट्यांवर विजय मिळवले आहेत. जेथे आमच्या वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होतो, तेथे आम्ही बहुतेक वेळा चांगली कामगिरी करतोच. यामुळे आमचे काम सोपे होते आणि विरोधी संघाच्या फलंदाजांना सहजपणे बाद करता येते. आमचे गोलंदाजही सज्ज आहेत,' असेही त्याने नमूद केले.
टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार
विराट कोहलीच्या नेतृत्वात अॅडिलेड कसोटीत भारताचा ४८ धावांनी निसटता पराभव झाला. भारत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने मागे आहे.
०१ कसोटीत गाबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा मागच्या २६ वर्षांत पराभव झाला. १९८८ मध्ये वेस्ट इंडीजने हरवले होते.
०४ कसोटींत गाबावर ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला. येथे भारताने एकूण ५ सामने खेळले आहेत.
१८ कसोटी सामने यजमान ऑस्ट्रेलियाने गाबावर मागच्या २५ वर्षांत जिंकले आहेत. उर्वरित लढती ड्रॉ झाल्या.
मिशेल-शॉन मार्श करणार विक्रम
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे मार्श बंधू मिशेल आणि शॉन खेळण्याची दाट शक्यता आहे. असे झाले तर ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत खेळणा-या भावांच्या यादीत त्यांचे नावही जुळेल. यापूर्वी डेव-नेड ग्रेगरी, इयान-ग्रेग चॅपेल, स्टीव्ह-मार्क वॉ या भावांची जोडी एकत्र मैदानावर कसोटीत खेळली आहे. 'आम्ही दोघे भाऊ खूप दिवसांपासून या क्षणाची वाट बघत होतो,' असे शॉन म्हणाला.
दोन्ही संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, मो. शमी, वरुण अॅरोन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा.
ऑस्ट्रेलिया : स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, क्रिस रोजर्स, शेन वॉटसन, शॉन मार्श, मिशेल मार्श, ब्रेड हॅडिन, मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, नॅथन लॉयन, जोश हेझलवूड, पीटर सीडल, रेयान हॅरिस.
अश्विन, धवलला संधी ?
धोनी संघात परतल्यामुळे यष्टिरक्षक वृद्धिमान साहा संघाबाहेर जाईल. या लढतीत ऑफस्पिनर आर. अश्विनचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय अॅरोनच्या जागी उमेश यादव किंवा धवलीला संधी मिळू शकते.