आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Test: Second Day Bowlers Performed Well, India Scored 408 Runs

दुसरी कसोटी: दुस-या दिवशी गोलंदाज चमकले, भारताचा डाव ४०८ धावांत आटोपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - वेगवान गोलंदाजांसाठी प्रसिद्ध असलेल्या गाबाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी फलंदाजांनी चमक दाखवली. त्याच खेळपट्टीवर दुस-या दिवशी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूडने आपल्या कसोटी पदार्पणात ५ गडी बाद करून भारताचा डाव ४०८ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाच्या ३ विकेट घेऊन भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.
दुस-या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने ४ बाद २२१ धावा काढल्या होत्या. यजमान संघ अजूनही भारतीय धावसंख्येपासून १८७ धावांनी मागे असून त्यांच्या हाती ६ विकेट शिल्लक आहेत. अंधूक प्रकाशामुळे दुस-या दिवसाचा खेळ वेळेआधी थांबवावा लागला. खेळ थांबला त्यावेळी कांगारूंचा युवा कर्णधार स्टिवन स्मिथ ६५ आणि मिशेल मार्श ७ धावांवर नाबाद होते.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. त्यांच्या सलामीवीरांनी ४७ धावांची सलामी िदली. कांगारूंचा धोकादायक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अपयशी ठरला. वॉर्नर २९ धावा काढून बाद झाला. उमेश यादवने त्याला अश्विनकरवी झेलबाद केले. यानंतर वॉटसन आणि क्रिस रोजर्स यांनी अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ९८ धावांपर्यंत पोहोचवला. या स्कोअरवर वॉटसन बाद झाला. वॉटसनने २९ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने २५ धावा काढल्या. त्याला ऑफस्पिनर आर. अश्विनने शिखर धवनकरवी स्लिपमध्ये झेलबाद केले.

रोजर्सचे सहावे अर्धशतक
एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने क्रिस रोजर्सने अर्धशतक ठोकले. त्याचे हे कारकीर्दीतील सहावे अर्धशतक ठोकले. रोजर्सने ७९ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या साह्याने ५५ धावांचे योगदान िदले. उमेश यादवने यष्टिरक्षक धोनीकरवी त्याला झेलबाद करून अडथळा दूर केला. रोजर्स बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या २४.५ षटकांत १२१ धावा झाल्या होत्या.

स्मिथ-मार्शची अर्धशतकी भागीदारी
यजमान संघ ३ बाद १२१ धावा असा संकटात सापडला असताना कर्णधार स्टिवन स्मिथ आणि शॉन मार्श यांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची अर्धशतकी भागीदारी करून डावा सावरला. दोघांनी संघाचा स्कोअर २०० पर्यंत पाेहोचवला. क्लार्कच्या जागी संघात स्थान मिळवणा-या शॉन मार्शने ७० चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा काढल्या. मार्शचा अडथळा उमेश यादवनेच दूर केला. मार्श उमेश यादवसाठी तिसरा बळी ठरला.

उमेशचा दणका
13 षटके
01 निर्धाव
48 धावा
03 बळी
3.69 इकॉनॉमी

उमेश यादवला या सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी संघात स्थान देण्यात आले. उमेशने आपली निवड सार्थ ठरवताना दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या रोजर्स, डेव्हिड वॉर्नर आणि शॉन मार्श या तीन दिग्गजांना पॅव्हेलियनमध्ये परतवले.

लवकर विकेट घेऊ
आम्ही ऑस्ट्रेलियापेक्षा पुढे आहोत. शुक्रवारी सकाळी त्यांच्या उर्वरित विकेट लवकर बाद करून सामन्यावर पकड मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. असे झाले तर सामन्यावर आमची पकड निर्माण होईल.
आर. अश्विन, ऑफस्पिनर.

भारताच्या ९७ धावांत ६ विकेट
दुस-या दिवशी टीम इंडियाने ४ बाद ३११ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताने आपल्या अखेरच्या ६ विकेट अवघ्या ९७ धावांत गमावल्या. बुधवारचा नाबाद फलंदाज अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी स्कोअर पुढे वाढवला. रहाणे आपल्या स्कोअरमध्ये ६ धावांची भर टाकून हॅझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचे शतक हुकले. रहाणेने १३२ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने ८१ धावा काढल्या. रोहितला (३२) वॉटसनने ३२८ च्या स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतवले. रहाणे आणि रोहितने पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. यानंतर कर्णधार धोनी आणि आर. अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. भारताने अखेरच्या ३ विकेट २३ धावांच्या अंतरात गमावल्या. धोनी आणि अश्विन यांना हॅझलवूडने बाद करून आपल्या ५ विकेट पूर्ण केल्या.

आकडे बोलतात
03 ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आत्तापर्यंत भारताविरूद्ध पदार्पणात ५ बळी घेतले आहे. यात, जेसन व ब्रेट ली पाठोपाठ हॅझलवूड तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
06 झेल घेऊन ऑस्ट्रेलियासाठी एका डावात सर्वाधिक झेलच्या विक्रमाची बरोबरी ब्रेड हॅडिनने केली. अशी कामगिरी वेली ग्राऊट, रॉड मार्श, इयान हेली यांनी केली आहे.
100 वा कसोटी डाव खेळण्याचा मान शेन वॉटसनने मिळवला. अशी कामगिरी करणारा वॉटसन २९ वा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. २५ खेळीदरम्यान त्याने ही कामगिरी केली.
36 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणा-याकडून अर्धशतक किंवा यापेक्षा अधिक धावा निघाल्या. स्मिथने ६५* धावा काढल्या.
पुढे पाहा धावफलक.....