आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Test: Vijay Century Bring India In Good Conditions

दुसरी कसोटी: विजयच्या शतकाने भारत सुस्थितीत, भारताच्या ४ बाद ३११ धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - गाबाच्या खेळपट्टीची खूपच दहशत होती. जुना इतिहासही घाबरवणारा होता. मागच्या ८३ वर्षांच्या इतिहासात येथे पहिल्या दिवशी एकाही विदेशी सलामीवीराला शतक ठोकता आले नाही. असे कितीतरी सलामीवीर येथे आले आणि गेले. मात्र, टीम इंडियाला येथे इतिहास बदलण्याचा विश्वास होता. झालेही तसेच. सलामीवीर मुरली विजयने गाबाच्या खेळपट्टीवर (१४४) शतक ठोकत एकाच झटक्यात सर्व इतिहास मागे टाकत नवा विक्रम केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे तुफानी वेगवान गोलंदाज थंड पडलेले होते. दिवसअखेर ४ बाद ३११ धावा काढून भारतीय संघ सुस्थितीत पोहोचला.

भारतीय संघाच्या सुस्थितीचे येथे महत्त्वाचे कारण आहे. भारताने गाबावर पहिल्याच दिवशी तीनशेचा स्कोअर पार केला. गाबावर मागच्या ५४ वर्षांत एकाही संघाला पहिल्या दिवशी अशी कामगिरी करता आली नव्हती. टीमे इंडियाला या मजबूत स्थितीत पोहोचवण्याचे श्रेय जाते ते सलामीवीर मुरली विजयच्या शतकाला. त्याने फक्त शतक ठोकले नाही तर तब्बल पाच तास एक टोक सांभाळून खेळ केला. मुरली विजयचे हे पाचवे शतक ठरले.

अर्धशतकी सलामी
मुरली विजय आणि शिखर धवन यांनी ५६ धावांची सलामी िदली. विदेशी भूमीवर मागच्या तीन वर्षांत भारतीय सलामीवीराची ही पहिली अर्धशतकी भागीदारी ठरली. धवन या वेळीसुद्धा अपयशी ठरला. चांगली सुरुवात केल्यानंतर त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो २४ धावा काढून बाद झाला. त्याने ३९ चेंडूंचा सामना करताना २४ धावा काढल्या. मिशेल मार्शने त्याला हॅडिनकरवी झेलबाद केले. धवन बाद झाल्यानंतर पुजारा आला. पुजारा (१८) सुमार पंचगिरीचा बळी ठरला.

विराट स्वस्तात बाद
मागच्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके ठोकून दमदार प्रदर्शन करणा-या विराट कोहलीला या वेळी तसे प्रदर्शन करता आले नाही. कोहली चुकीचा फटका खेळून बाद झाला. कोहलीने २७ चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने १९ धावा काढल्या. हॅझलवूडने हॅडिनकरवी त्याला टिपले.

विजय-रहाणेची शतकी भागीदारी
कोहली बाद झाल्यानंतर विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची शतकी भागीदारी केली. विजय बाद झाल्यानंतरच ही भागीदारी मोडली. विजयने २१३ चेंडूंचा सामना करताना २२ चौकारांच्या साह्याने १४४ धावा काढल्या. नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक हॅडिनने त्याचा झेल घेत विजयची खेळी संपवली.

अजिंक्य रहाणेचे अर्धशतक
विजय बाद झाल्यानंतर रहाणे आणि रोहितच्या जोडीने अधिक पडझड होऊ दिली नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांनी अभेद्य ५० धावांची भागीदारी केली. रहाणे-रोहितने भारताचा डाव ३११ धावांपर्यंत पोहोचवला. रहाणेने ८५ चेंडूंत ५० धावा पूर्ण केल्या. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रहाणे ७५ आणि रोहित शर्मा २६ धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलियासाठी दिवस निराशाजनक ठरला. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले. याचा भारताने फायदा उचलला. इतकेच नव्हेतर त्यांचे दोन वेगवान गोलंदाज मिशेल मार्श आणि हॅझलवूड स्नायू दुखावल्यामुळे मैदानाबाहेर गेले.

हेही आहे महत्त्वाचे
- अजिंक्य रहाणेने कारकीर्दीतील सहावे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे अर्धशतक साजरे केले. रहाणेने नाबाद ७५ धावा काढल्या. अ‍ॅडिलेडला सुद्धा त्याने ७५ धावा काढल्या होत्या.
- भारताबाहेर विदेशात टीम इंडियाचे सर्वाधिक २९ कसोटीत नेतृत्व करण्याचा विक्रम आता महेंद्रसिंग धोनीच्या नावे जमा झाला आहे. धोनीने गांगुलीच्या २८ कसोटीच्या विक्रमाला मागे टाकले.
-गाबाच्या मैदानावर पहिल्या दिवशी तीनशेपेक्षा अधिक धावा काढणारा दुसरा संघ भारत ठरला आहे. यापूर्वी १९६०-६१ मध्ये वेस्ट इंडीजने येथे पहिल्याच दिवशी ७ बाद ३५९ धावा काढल्या.
-विजयने कारकीर्दीतील पाचवे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथे शतक ठोकले. याशिवाय त्याने तीन सलग डावात अर्धशतकापेक्षा अधिक धावा काढण्याची कामगिरी केली. अ‍ॅडिलेडला त्याने ५३ आणि ९९ तर ब्रिस्बेनला १४४ धावा काढल्या.
-ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग तीन ५० प्लस स्कोअर करणारा विजय भारताचा पहिला सलामीवीर ठरला आहे.
-भारतीय उपखंडाबाहेर सलग तीन अर्धशतके ठोकणारा मुरली विजय भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी सुनील गावसकर (वि.वेस्ट इंडीज १९७०-७१), माधव आप्टे (वि. वेस्ट इंडीज १९५३), गौतम गंभीर (वि. द. आफ्रिका २०१०) आणि शिवसुंदर दास (वि. झिम्बाब्वे २००१) यांनी केली आहे.
- मागच्या ३५ डावांत विदेशी भूमीवर प्रथमच भारताच्या सलामीवीरांनी ५० पेक्षा अधिक धावांची सलामी दिली आहे. हे मोठे यश मानले जात आहे.
पुढे पाहा धावफलक