आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sehwag Can Still Make The Indian Side: Sanjay Bangar

वीरूच्या पुनरागमनास संजय बांगरचा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय संघाचा सहायक प्रशिक्षक आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा प्रशिक्षक संजय बांगर याने सेहवागच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत त्याने तिशी पार केली असली तरीही ताे भारतीय संघात परतू शकताे, असा विश्वास व्यक्त केला.

सेहवाग पुन्हा भारतीय संघात परतू शकतो का? या प्रश्नावर बोलताना बांगरने नक्कीच वीरूत तेवढी क्षमता असल्याचे सांगितले. मार्च २०१३ मध्ये भारतीय संघासाठी अखेरचा सामना खेळलेल्या सेहवागच्या क्षमतांवर प्रचंड विश्वास असल्याचेच बांगरने नमूद केले. वीरूने तंदुरुस्तीवर प्रचंड भर दिला असून भारतीय संघात परतण्याच्या ध्येयाने तो प्रेरित आहे. पंजाबच्या संघात सलामीला वीरूबरोबर मुरली विजय दिसणार असून राखीव म्हणून मनन व्होराचा पर्यायदेखील उपलब्ध ठेवण्यात आला आहे. वीरूबरोबरच विजयदेखील भारतीय संघातील सलामीच्या जागेचा दावेदार आहे. जो खेळाडू दबावात चांगला खेळ करू शकतो, त्याची संघात निवड होऊ शकते, असेही बांगरने नमूद केले.

दिग्गज लवकरच येणार
मिशेल जॉन्सन, शॉन मार्श सोमवार रात्रीपर्यंत संघात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलरही मंगळवार, बुधवारपर्यंत भारतात दाखल होणार आहेत. या दिग्गज खेळाडूंना एकत्र बांधून संघ उभारणी करणे आणि आपापसातील संबंध दृढ करणे फार जिकिरीचे नसल्याचेही संजय बांगरने सांगितले.

भारतीय खेळाडू दमदार
विदेशी खेळाडूंबरोबरच भारतीय खेळाडूदेखील दमदार खेळ करत आहेत. मागील सत्राच्या उत्तरार्धात मनन व्होरा, वृद्धिमान साहा यांनीदेखील चांगला खेळ केला होता. त्यामुळे कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून राहण्याचे आमचे धोरण नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत प्रत्येकाने शक्य तेवढे अधिकाधिक योगदान द्यायचे, हाच आमचा मंत्र असल्याचेही बांगरने नमूद केले.