आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप पाटीलसमोर टीम इंडियाच्या निवडीचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणजी विजेता मुंबई आणि शेष भारत यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इराणी ट्रॉफीचा सामना सुरू आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली जाईल. निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील अँड कंपनी ज्यांना वार्षिक 40 लाख रुपये मानधन मिळते, त्यांच्यासमोर यंदा संघ निवडीचे आव्हान सोपे ठरणार नाही. भारताने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत पुन्हा भानगड नको म्हणून निवडीत दूरदर्शिता आवश्यक आहे. इराणी ट्रॉफीच्या नेमक्या आधी डिहायड्रेशनमुळे वीरेंद्र सेहवाग खेळू शकला नाही. यामुळे निवड समितीची चिंता वाढली आहे. निवड समितीला सेहवागचीही चाचपणी करायची होती. सेहवाग गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नसल्याने त्याला वनडे संघातून बाहेर करण्यात आले होते.

रविवारी सेहवागची निवड होते की नाही, हे सांगणे कठीण आहे. मात्र, युवराजसिंगची निवड होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. युवराजच्या जागी सुरेश रैनाची दावेदारी मजबूत आहे. रैनाने इराणी ट्रॉफीत दमदार 134 धावांची खेळी केली होती. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही त्याने उत्तम प्रदर्शन केले होते. म्हणण्याचा अर्थ हा आहे की रैना चांगल्या फॉर्मात आहे. तो मधल्या फळीत उपयोगी सिद्ध होऊ शकतो. रैनाशिवाय मुरली विजय, वसीम जाफर, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, अंबाती रायडू, मनोज तिवारीही निवडीसाठी प्रबळ दावेदार झाले आहेत. सेहवागच्या अनुपस्थितीत मुरली विजयला जणू काही लाइफ लाइन मिळाली. त्याने मिळालेल्या संधीचे सोने करताना शतक ठोकले. दुस-या डावातही त्याने संक्षिप्त मात्र चांगल्या 35 धावा काढल्या. जाफरनेही स्टाइलिश पद्धतीने धावा काढल्या. इंग्लंडविरुद्ध 12 वा खेळाडू म्हणून संघात असलेल्या अजिंक्य रहाणेनेही जोरदार प्रदर्शन केले. या तीन खेळाडूंपैकी दोघांची टीम इंडियात निवड होणे जवळपास निश्चित आहे. या तिघांमुळे सेहवाग-गंभीरची जोडी या वेळी मोडली जाऊ शकते. मुंबईच्या रोहित शर्माने मागच्या रणजी सत्रात चांगली कामगिरी केली होती. मात्र, इराणी ट्रॉफीत तो शून्यावर बाद झाला. यामुळे निवड समितीच्या अडचणी वाढल्या आहेत. होय, रैना आणि सचिन तेंडुलकरच्या शतकांमुळे निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनी निश्चितपणे थोडा सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. सचिनची ही खेळी अप्रतिम होती. त्याने आपल्या खेळीत धैर्य, आक्रमण आणि संकटाच्या वेळी कशी फलंदाजी करायची, याचे उत्तम उदाहरण सादर केले.

फक्त फलंदाजांची निवड नव्हे, तर गोलंदाजांची निवडही मोठे आव्हान असेल. जहीर खान, उमेश यादव, इरफान पठाण जखमी आहेत. ईशांत शर्मा उपचारासाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांची निवड सोपी ठरणार नाही. एस. श्रीसंत नुकताच दुखापतीतून सावरला आहे. इराणी ट्रॉफीत त्याने सचिनविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. दोन्ही टोकाहून चेंडू स्विंग करताना त्याने वेगवान गोलंदाजाला आवश्यक असलेली स्फुर्ती दाखवली. अशा परिस्थितीत शमी अहेमद, भुवनेश्वरकुमार आणि अशोक डिंडावर पुन्हा एकदा भरवसा केला जाऊ शकतो. फिरकीत आर. अश्विनने निराश केले होते. इराणी ट्रॉफीत हरभजनसिंग आणि प्रग्यान ओझा यांच्या निवड समितीचे लक्ष आहे. भज्जीने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी करून आपली दावेदारी मजबूत केली. फिरकी गोलंदाजी एकेकाळी आपले प्रमुख शस्त्र असायची. आता हीच बाजू आपली दुबळी झाली आहे, हेसुद्धा कटू सत्य आहे. आता रविवारी संदीप पाटील अँड कंपनी एक संतुलित संघ निवडू शकतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.