आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयस्क खेळाडू सुपरफ्लॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-6 मध्ये युवा खेळाडूंची प्रतिभा चमकत आहे. चेंडूला अतिरिक्त ताकदीने हिट करताना, मजबूत खांद्याने चौकार, षटकार ठोकताना आणि मजबूत मनाने दम दाखवताना युवा खेळाडू दिसत आहेत. माइक हसी आणि राहुल द्रविड वगळता उर्वरित सर्व वयस्क खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. यावरून आगामी सत्रात वयस्क खेळाडूंची गच्छंती होईल, असे समजावे काय ?

आयपीएल-6 मुळे मी द्विधा मन:स्थितीत आहे. उच्च गुणवत्ता असणारे क्रिकेटपटू रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने, युवराजसिंग, कुमार संगकारा, वीरेंद्र सेहवाग, अ‍ॅडम गिलख्रिस्ट का फ्लॉप होत आहेत, हे मला समजलेले नाही. मी या यादीत सचिन तेंडुलकरचे नावसुद्धा जोडू इच्छितो. कारण त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याची कामगिरी झालेली नाही. वाढते वय आणि फिटनेस या खेळाडूंच्या फ्लॉप होण्याचे कारण आहे की यांचे अपयश अस्थायी आहे, ही माझ्यासमोर अडचण आहे. या खेळाडूंचे ट्रॅक रेकॉर्ड बघण्याची गरज नाही. ही सर्व आधुनिक क्रिकेटमधील प्रस्थापित व्यक्तिमत्त्वे आहेत. मागच्या आयपीएलमध्ये यांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र, आता नेमके काय झाले ? हे खेळाडू दुय्यम का ठरत आहेत ?

हे स्पष्ट आहे की, वय आणि फिटनेस हे प्रमुख कारण आहे. मात्र, 38 वर्षीय मायकेल हसी (चेन्नई सुपरकिंग्ज) आणि 40 वर्षीय राहुल द्रविड (राजस्थान रॉयल्स) यांना हे कारण लागू होत नाही. हे दोघे आयपीएल-6 मध्ये शानदार कामगिरी करीत आहेत. द्रविडच्या नेतृत्वाचीही स्तुती होत आहे. हे दोघे अपवाद आहेत. मात्र, उर्वरित 30 प्लस खेळाडूंसमोर वय आणि फिटनेसची मोठी अडचण आहे. टी-20 क्रिकेट कितीही वेगवान का असेना, यापूर्वी या स्पर्धेत वयस्क खेळाडू सचिन, मॅकग्रा, शेन वॉर्न आणि मुरलीधरन यांनी दम दाखवला आहे. यातील सचिन आणि मुरलीधरन अजूनही खेळत आहेत. मुरलीधरनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे सचिनच्या खेळात आता पूर्वीसारखी चमक राहिली नाही. केकेआरच्या जॅक कॅलिसचेच उदाहरण घ्या. त्यालासुद्धा पूर्वीसारखी कामगिरी करता आलेली नाही. त्याच्याशिवाय श्रीलंकेचा कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अँग्लो मॅथ्यूज, तिलकरत्ने दिलशानसुद्धा फ्लॉप होत आहेत. फिटनेसची अडचण 30 प्लसचे वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंग यांच्यासोबतसुद्धा आहे. हे दोघेही सलगपणे अपयशी ठरत आहेत.

आयपीएलची सहावी स्पर्धा युवा खेळाडूंची बहार आहे. वयस्क खेळाडू संघर्ष करीत असताना युवा खेळाडू चमकत आहेत. माझ्या मते, येत्या काळात टी-20 हा खेळ फक्त युवा खेळाडूंचाच खेळ होऊन जाईल. कारण स्पष्ट आहे. चौकार, षटकार मारण्यासाठी खेळाडू अतिरिक्त ताकद लावत असल्याचे दिसत आहे. शक्तिशाली पाय, मजबूत मन असलेले खेळाडू धूम करीत आहेत. एकेक धाव वाचवण्यासाठी खेळाडू चपळ कामगिरी करीत आहेत. अशी कामगिरी करणे आता वयस्क खेळाडूंसाठी कठीणच आहे.

माझ्या मते आता पुढच्या आयपीएलसाठी ज्या वेळी बोली होईल, त्या वेळी 30 वर्षांपर्यंतच्या खेळाडूंवर अधिक बोली लागेल. संगकारा, जयवर्धने, सेहवाग, युवराज, जहीर खान आणि युसूफ पठाण यांच्यावर बोली लावण्यास फ्रँचायझी अधिक रुची दाखवणार नाही, असेही होऊ शकते. आणखी बरेच आश्चर्य पाहण्यासाठी आपणाला प्रतीक्षा करावी लागेल, असे मला वाटते.