आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस : सेरेना, स्तोसूर, ली ना, टॉमिक तिसर्‍या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकेची स्टार सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पध्रेत शानदार कामगिरी कायम ठेवताना तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. चीनची ली ना, ऑस्ट्रेलियाची समंथा स्तोसूर यांनीसुद्धा विजयी लय कायम ठेवली आहे.

महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत अव्वल मानांकित सेरेनाने गुरुवारी दुसर्‍या फेरीत फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाला 6-3, 6-2 ने मात दिली. तिने हा सामना 67 मिनिटांत आपल्या नावे केला. सहावी मानांकित चीनच्या ली नाने रोमानियाच्या सिमोना हालेपला 6-2, 1-6, 6-0 ने मात दिली. र्जमनीच्या सेबिने लिसिकीने रशियाच्या एलिना वेस्निनाचे आव्हान संपुष्टात आणले. समंथा स्तोसूरने रशियाच्या ओल्गा पुचकोवाला 6-2, 6-2 ने मात दिली. जपानच्या किमिको दाते, स्लोवाकियाच्या डॉमिनिको सिबुलकोवा, क्रोएशियाची पेत्रा मार्तिक आणि अमेरिकेच्या मेडिसन किज यांनीसुद्धा आपापल्या लढती जिंकून तिसर्‍या फेरीत प्रवेश केला.

पावसाचा व्यत्यय; पेस, योकोविकची आघाडी
विम्बल्डन टेनिस स्पर्धेदरम्यान गुरुवारी पावसाने हजेरी लावली. या पावसाच्या व्यत्ययामुळे स्पर्धेतील सामने थांबवावे लागले. या वेळी सर्बियाच्या नोवाक योकोविकने अमेरिकेच्या बॉबी रेनाल्ड्सविरुद्ध लढतीत 7-6 ने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली. दुसरीकडे भारताचा लियांडर पेस-चेक गणराज्याच्या रादेक स्तेपानेक आणि जोनाथन एर्लिस -डॅनियल ब्रासिएल यांच्यात पुरुष दुहेरीची लढत रंगली होती. या वेळी या चौथ्या मानांकित पेस-स्तेपानेक जोडीने पहिला सेट 7-6 ने जिंकून आघाडी घेतली. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत अखेर थांबवावी लागली.

लोड्रा निवृत्त; सेप्पीची आगेकुच
चौथ्या दिवशीसुद्धा दुखापतींनी आपले अस्तित्व दाखवले. फ्रान्सच्या मायकेल लोड्राने पहिला सेट 5-7 ने गमावल्यानंतर सामन्यातून माघार घेतली. तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याने माघार घेतल्यामुळे इटलीच्या आंद्रे सेप्पीने तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकने अमेरिकेच्या जेम्स ब्लॅकला 6-3, 6-4, 7-5 ने पराभूत करून आगेकूच केली.

छायाचित्र :रशियाच्या वेस्निनाविरुद्ध सर्व्हिस करताना र्जमनीची सेबिना लिसिकी. सेबिनाने हा सामना जिंकला.