आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच ओपन टेनिस: सेरेना विल्यम्स पुन्हा चॅम्पियन..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- जागतिक क्रमवारीतील नंबर वन आणि अमेरिकेची महिला खेळाडू सेरेना विल्यम्सने रोलँड गॅरोसच्या लाल मातीवर पुन्हा एकदा आपले साम्राज्य स्थापन केले आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सेरेनाने दुसरी मानांकित रशियाच्या मारिया शारापोवाला सरळ दोन सेटमध्ये 6-4, 6-4 ने पराभूत करून जेतेपद पटकावले. फ्रेंच ओपनच्या एकेरीत सेरेनाने तब्बल अकरा वर्षांचा दुष्काळ संपवत बाजी मारली. सेरेनाने 2002 मध्ये येथे विजेतेपद जिंकले होते.

सेरेनाचे 16 वे ग्रँडस्लॅम
सेरेना विल्यम्सचे हे कारकीर्दीतील तब्बल 16 वे एकेरीचे ग्रँडस्लॅम ठरले. सेरेनाने दोन वेळा फ्रेंच ओपन, चार वेळा अमेरिकन ओपन आणि प्रत्येकी पाच वेळा ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डनचे एकेरीतील ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

फायनलमध्ये सेरेनाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत वर्चस्व राखले. सेरेनाने 7 ऐस तर शारापोवाने 2 ऐस मारले. शारापोवाला स्वत:च्या चुका भोवल्या. तिने तब्बल चार डबल फॉल्ट केले. सेरेनाने 32 तर रशियन खेळाडूने फायनलमध्ये 12 विनर्स मारले. सेरेनाने 10 तर मारियाने 3 नेट पॉइंट मिळवले. माजी खेळाडू अरांता सांचेजने सेरेनाला बक्षीस प्रदान केले.

सेरेना शारापोवाला वरचढ
सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांच्यात आतापर्यंत 16 वेळा लढती झाल्या. यात सेरेनाने तब्बल 14 वेळा बाजी मारली. रशियन खेळाडू शारापोवाला फक्त दोन वेळा विजय मिळवता आला. सेरेनाला शारापोवाने (2004) अखेरीस विम्बल्डनमध्ये हरवले होते.

सेरेना विल्यम्सचे ग्रँडस्लॅम करिअर
फ्रेंच ओपन 2002, 2013
अमेरिकन ओपन 1999, 2002, 2008, 2012
ऑस्ट्रेलियन ओपन 2003, 2005, 2007, 2009, 2010
विम्बल्डन 2002, 2003, 2009, 2010, 2012

>हा अविश्वसनीय विजय आहे. अकरा वर्षांनंतर मला याठिकाणी विजेतेपद मिळाले. समर्थन देणाºया चाहत्यांचे आभार. येथे पुन्हा जिंकण्यास मी इच्छुक आहे.
- सेरेना विल्यम्स, विजेती