कोची- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुस-या लढतीत भारताने इंग्लंडवर १२७ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. मधल्या फळीतील फलंदाज रविंद्र जडेजा याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने ही कामगिरी केली. राजकोटमधील पहिला सामना भारताने ९ धावांनी गमाविला होता.
कोची येथे झालेल्या या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करीत ६ बाद २८५ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, इंग्लंडचा संघ ३६ षटकात १५८ धावांत गुंडाळला गेला. इंग्लंडकडून पीटरसन (४२) जे. रुट (३६) आणि समित पटेल नाबाद ३० यांनी सर्वांधिक योगदान दिले. त्याआधी सुरैश रैना (५५), कर्णधार महेंद्रसिंग धोनी (७२) आणि रविंद्र जडेजा (नाबाद ६१) यांनी ४ बाद ११९ अशा अडचणीतून बाहेर काढत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली होती.
जडेजाची अष्टपैलू कामगिरी- रविंद्र जडेजाने इंग्लंडला एकाच षटकात दोन धक्के दिले. जो रुट आणि ख्रिस वोक्सला त्याने बाद केले. रुट 36 धावा काढून बाद झाला. तर वोक्स शुन्यावर पायचीत झाला. तसेच त्याने उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करताना तळातील फलंदाज ड्रेनब्रिच याला धावबाद करीत इंग्लंडचा डाव संपविला. त्याआधी त्याने केवळ ३७ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ६१ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
भुवनेश्वरचे तीन धक्के- भुवनेश्वर कुमारने ख-या अर्थाने इंग्टलंडला बॅकफुटवर नेले. त्याने कर्णधार कुक, केविन पीटरसन आणि ओईन मॉर्गनला बाद करुन भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भुवनेश्वरने कुकला 17 धावांवर पायचीत केले. कुक आणि केविन पीटरसन यांनी आक्रमक फलंदाजी करीत अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 54 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी कुमारने मोडली. त्यानंतर त्याने धोकादायक पीटरसनला 42 धावांवर त्रिफळाचीत केले. तर ओईन मॉर्गनला त्याने शुन्यावरच तंबूत पाठविले.
आर. अश्विनने क्रेग किस्वेटरला बाद करुन इंग्लंडला पाचवा धक्का दिला. किस्वेटर 18 धावा काढून बाद झाला.
त्यानंतर त्याने स्टीव्हन फिन (०) आणि ट्रेडवेल (१) यांना बाद केले. वेगवान गोलंदाज शमी अहमदने इंग्लंडला पहिला धक्का दिला. इयन बेलला त्याने बाद केले. बेल 1 धाव काढून बाद झाला.