आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- उपहारानंतर ऑस्ट्रेलियाचा गडगडलेला डाव तळाच्या फलंदाजांनी सावरला. ऑस्ट्रेलियाचे शेपुट पुन्हा एकदा भारतासाठी डोकेदुखी ठरले. एका वेळेस ऑस्ट्रेलियाची 7 बाद 136 अशी अवस्था होती. परंतु, स्टीव्ह स्मिथ आणि पीटर सिडल यांनी भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 8 बाद 231 धावांपर्यंत मजल मारली होती. पीटर सिडल 47 तर जेम्स पॅटिंसन 11 धावांवर नाबाद होते. अखेरच्या फलंदाजांनी धावा जोडल्यामुळे भारताला 200 धावांच्या आत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळता आला नाही. अश्विनने 4, रविंद्र जडेजा आणि इशांत शर्माने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
आर. अश्विनने स्टीव्ह स्मिथला बाद करुन मोठा अडथळा दुर केला. स्मिथने 46 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट्स 136 धावांवरच पडल्या होत्या. त्यानंतर स्मिथने पीटर सिडलसोबत 53 धावांची भागीदारी करु संघाला 200 धावसंख्येच्या जवळ नेले. ऑस्ट्रेलियाच्या डावात सर्वाधिक धावा स्मिथनेच काढल्या.
आर. अश्विनने मिशेल जॉन्सनचा त्रिफळा उडविला उडवून सातवा धक्का दिला. जॉन्सनला अश्विनचा कॅरम बॉल ओळखताच आला नाही. स्टंपच्या बाहेर चेंडू वळेल असे वाटल्याने त्याने खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. परंतु, चेंडू झपकन आत आला आणि त्रिफळा उडवून गेला. जॉन्सनने 3 धावा काढल्या.
फिरकीच्या जाळ्यात कांगारु पुरते अडकले. जडेजाने ग्लेन मॅक्सवेलला बाद करुन सहावा धक्का दिला. मॅक्सवेलने षटकार आणि चौकार ठोकून आक्रमक सुरुवात केली. परंतु, पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट फेकून परतला. मॅक्सवेल 10 धावा काढून बाद झाला.
आर. अश्विनने एड कोवानचा त्रिफळा उडवून तिसरा धक्का दिला. त्यानंतर जडेजाने शेन वॉटसनला अप्रतिम चेंडूवर चकविले. तर दोन षटकांनी अश्विनने मॅथ्यू वेडला बाद केले.
अश्विनच्या चेंडूवर स्विप मारण्याच्या प्रयत्नात कोवानचा लेग स्टंप उडाला. त्याने 38 धावा काढल्या. तोदेखील स्थिरावल्यानंतर बेजबाबदार फटका मारून मोठी खेळी न करता परतला. मोहाली कसोटीच्या दुस-या डावातही तो अशाच पद्धतीने बाद झाला होता. अश्विननेच त्याला बाद केले होते.
कर्णधार म्हणून पहिली कसोटी खेळणारा वॉटसन रविंद्र जडेजाच्या फिरकीत अडकला. पुढे सरसावून खेळण्याच्या प्रयत्नात तो फसला. त्याला पुढे येताना पाहून जडेजाने चेंडूचा टप्पा बदलला. धोनीने त्यावेळी यष्टींमागे कोणतीही चूक न करताना शिताफीने वॉटसनला बाद केले. वॉटसन 17 धावा काढून बाद झाला.
मॅथ्यू वेडही वॉटसनप्रमाणेच अश्विनला पुढे सरसावत खेळला. परंतु, चेंडू जास्त उसळला आणि बॅटची कड घेऊन मुरली विजयच्या हातात गेला. तो 2 धावा काढून परतला. टीव्ही रिप्लेमध्ये मात्र वेड कमनशीबी ठरल्याचे दिसले. बॅटला चेंडूला स्पर्श झाला नाही. बॅट त्याच्या पॅडला लागली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.